
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना युतीसाठी साद घातलीय. राज ठाकरेंना मी कधीही भेटू, आणि बोलू शकतो असं विधान युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलं आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंकडून युतीसाठी वारंवार राज ठाकरेंना साद घातली जातेय. आजही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसदर्भात मोठं विधान केलंय. राज ठाकरे यांना कधीही भेटू आणि फोन करू शकतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांनी घेतलेल्या महामुलाखतीत केलं आहे. एवढंच नव्हे तर दोन्ही बंधूंच्या युतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधा-यांवर देखील शरसंधान साधलंय. तर दोन्ही भाऊ कधीही भेटू, बोलू शकतात असं सकारात्मक विधान मनसे नेते बाळा नांदगावकरांनी केलं आहे.
मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात विनायक राऊतांनी देखील महत्त्वाचं वक्तव्य केलंय. निवडणुका जाहीर झाल्यानंतरच युतीचा निर्णय होणार असल्याचं मोठं विधान त्यांनी केलंय. तर दुसरीकडे युतीच्या चर्चांवरून शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावलाय.
हेही वाचा : तब्बल 5 हजार किलो मोफत चिकनचं वाटप, पुण्यातल्या भन्नाट ऑफरची राज्यात चर्चा!
सामनाला दिलेल्या महामुलाखतीच्या पहिल्या भागात देखील उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं होतं. राज ठाकरे आता माझ्यासोबत आहेत. समाजाच्या हितासाठी आमचा संघर्ष सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं.
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक आहेत. राज ठाकरेंसमोर देखील उद्धव ठाकरेंनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली होती. मात्र, दुसरीकडे राज ठाकरेंनी अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे मराठीसाठी एका मंचावर येणारे हे दोन्ही ठाकरे बंधू आगामी पालिका निवडणुकीच्या मैदानात एकत्र उतरणार का? याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.