Kokan Railway News Update: कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. डिसेंबर-जानेवारीत अनेक जण कोकणात दाखल होतात. मात्र कोकणात जायचं म्हणजे ट्रेनचे तिकीट मिळणे मुश्कील असते. अशावेळी कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांत काही एक्स्प्रेसना थांबा नसतो. त्यामुळं अनेकांना दुसऱ्या स्थानकात उतरून खासगी गाडीने प्रवास करावा लागतो. मात्र आता कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकण मार्गावर आठ मेल-एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे.रविवारपासून या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे.
गाडी क्रमांक 12977/78 मरूसागर एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22655/56 एर्नाकुलम–हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानकात दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. तसेच, गाडी क्रमांक 22475/76 हिसार–कोइम्बतूर–हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 16335/36 गांधीधाम–नागरकोईल–गांधीधाम एक्सप्रेस या गाड्यांना कणकवली स्थानकात थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी 2 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. त्यानुसार, गाडी क्रमांक 12977 एर्नामुल जंक्शन-अजमेर एक्सप्रेस ला सिंधुदुर्ग येथे 2 नोव्हेंबरपासून, तर गाडी क्रमांक 12978 अजमेर – एर्नामुल जंक्शन एक्सप्रेस ला 7 नोव्हेंबरपासून थांबा देण्यात येईल. ही रेल्वे गाडी सिंधुदुर्ग स्थानकावर सकाळी 11.43 ला 5 मिनिटे थांबेल. गाडी क्रमांक 22655 ला 5 नोव्हेंबरपासून ही गाडी सकाळी 7.08 वाजता 2 मिनिटे थांबेल आणि 22656 ला 7 नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग येथे थांबा असेल आणि ही सकाळी 7.20 ला 2 मिनिटे थांबेल.
कणकवली स्थानक
गाडी क्रमांक 22475 ला 5 नोव्हेंबरपासून, 22473 ला 8 नोव्हेंबरपासून रात्री 9.43 ला थांबेल, 16335 ला 7 नोव्हेंबरपासून 9.48 ला थांबेल आणि 16336 ला 11 नोव्हेंबरपासून सकाळी 6.30 वाजता थांबा देण्यात येणार आहे. 2 मिनिटे थांबून ही गाडी 6.32 ला पुढील प्रवासासाठी रवाना होईल. प्रवाशांनी रेल्वेगाडीचे आरक्षण करताना सुधारित थांबे तपासावेत, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
FAQ
प्रश्न १: कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?
उत्तर: कोकण रेल्वेने कोकण मार्गावरील आठ मेल-एक्सप्रेस गाड्यांना सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रश्न २: हा निर्णय का घेण्यात आला?
उत्तर: डिसेंबर-जानेवारीमध्ये कोकणात अनेक प्रवासी दाखल होतात, पण महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा नसल्याने त्यांना दुसऱ्या स्थानकात उतरून खासगी गाडीने प्रवास करावा लागत होता. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
प्रश्न ३: या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली आहे?
उत्तर: या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून (२ नोव्हेंबरपासून) टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे
