फिक्सर असलेल्या ओएसडींच्या नावांना मंजुरी देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिदेंच्या मंत्र्यांकडून फिक्सर पीए आणि ओएसडीची नाव देण्यात आली. त्यांची नावं माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्यावरून आता आरोपप्रत्यारोप सुरू झालेत..
मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलं आहे.”माणिकरावर कोकाटे यांना पीएस, ओसएडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो हे माहिती नसेल. त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय घेतला जातो. मी कॅबिनेटमध्ये तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण ज्यांची नावं फिक्सर, चुकीच्या कामात गुंतली आहेत त्यांना मान्यता देणार नाही हे स्पष्ट केलं होतं. 125 च्या आसपास नावं आली आहेत. 109 नावं क्लिअर केली आहेत. पण इतरांच्या नावे काहीतरी आरोप, चौकशी किंवा मंत्रालयात ज्यांच्याबद्दल फिक्सर अशी ओळख आहे. कोणीही नाराज झाले तरी मी त्यांना मान्यता देणार नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात ते फिक्सर पीए आणि ओएसडी कोण याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आता शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांकडून फिक्सर पीए आणि ओएसडीची नाव देण्यात आली. त्यांची नावं माझ्याकडे असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. तर दुसरीकडे राऊतांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलं आहे.
संजय राऊतांच्या या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान मी पीए आणि ओएसडी यांची नावं पाठवली होती त्यांना मंजूरी मिळाली. संजय राऊत बोलले तसा विषय नसल्याचं परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याचंही सरनाईक यांनी स्वागत केलं आहे.
तर ही कारवाई तोंडदेखली नको, संपूर्ण यंत्रणा सुधारण्याची गरज असल्याचं मत विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं आहे.
दलाल आणि फिक्सर ओएसडींची नियुक्त करणार नसल्याचं स्पष्ट करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मित्रपक्षांनाच थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये कुणी नाराज झालं तरीही या नावांना मंजुरी दिली जाणार नसल्याचं म्हणत फडणवीसांनी थेट मंत्र्यांनाच दम भरल्याचं दिसून आलं. पीए आणि ओएसडींवरुन माणिकराव कोकाटेंनी खडे बोल सुनावून फडणवीसांनी सरकारमध्ये फडणवीसांचाच शब्द अंतिम असेल हा स्पष्ट संदेश दिला आहे.
