Thackeray Brother Meets: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सकारात्मक प्रतिक्रिया आलीये. संजय राऊतांनी य़ा भेटीचं स्वागत केलंय. दोन्ही भावांच्या वारंवार अशा भेटी व्हाव्यात असं ठाकरेंच्या पक्षानं म्हटलंय. उद्धव ठाकरे राज ठाकरेंबाबत सकारात्मक झाल्याची ही लक्षणं मानली जाऊ लागलीयेत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या भेटीगाठी वाढत चालल्यात. राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर दोघंही भाऊ एकत्र येणं सातत्यानं टाळत होते. पण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्यात. या भेटी लग्नसमारंभातल्या होत्या. पण लग्न समारंभातल्या या भेटीगाठींबाबत शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बंधूभेटीचं स्वागत करण्यात आलंय. दोन्ही भावांनी वारंवार भेटावं असं राऊत म्हणालेत.
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना ठाकरे ब्रँड संपवायचा आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. अशावेळी दोन्ही भावांनी एकत्र यावं असं संजय राऊतांनी अप्रत्यक्षरित्या सूचित केलंय.
आतापर्यंत या भेटीवर शिवसैनिक किंवा मनसैनिक फार काही बोलत नव्हते. शेवटी राज आणि उद्धव ठाकरे दोघंही भाऊ आहेत त्यांनी कौटुंबीक कार्यक्रमात भेटण्यात गैर नसल्याचं सांगण्यात येत होतं. पण दोघांच्याही या भेटींवर आता शिवसैनिक बोलू लागलेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना जर या भेटी सकारात्मक घेत असतील तर मनसेतील एकत्रिकरणवादी नेतेही आता बंधूभेटीवर येत्या काळात नक्कीच बोलतील.
‘आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं’; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद
राजकीय मतभेदातून एकमेकांपासून वेगळे झालेल्या ठाकरे बंधुंना आता पुन्हा कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची साद घातलीये. आपल्या राजकरण पाहण्याच्या वेगळ्या परिप्रेक्ष्यातून राज ठाकरेंनी 2006 साली शिवसेनेतून बाजूला होत आपली वेगळी चूल मांडली. या घटनेला जवळपास 20 वर्ण होत आली तरी कार्यकर्त्यांना आजही दोन्ही भाऊ एकत्र येतील अशी आशा आहे. आणि हिच आशा पुन्हा समोर आली, शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरने. या बॅनरमधून कार्यकर्त्यांनी ठाकरे भावांनी राज्यासाठी एकत्र याव असं म्हटलंय.मनसैनिक आणि शिवसैनिकांच्या या भावना असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हंटलय. तर याआधी मनसेने अनेकदा प्रयत्न केले आता मोठ्या भावाने पुढाकार घ्यायला हवा, असं मनसैनिकांनी म्हटंलय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. अनेकदा उघड उघड दोघे एकमेकांवर टीका करताना महाराष्ट्राने पाहिलंय. असं असलं तरी कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे कुटुंब एकत्रही पहायाला मिळालंय. राज ठाकरेंनी मनसेच्या रूपाने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली असली तरी आजही त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्यांपासून, कार्यकर्ते, सोबतच नेत्यांनीही केलीयेत. आता पुन्हा बॅनरमुळे ठाकरेंच्या एकत्रिकरणाची चर्चा रंगलीये. आता आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या या भावनांचा विचार होतो का. राज आणि उद्धव यांचे मनोमिलन होते का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
