Pune Crime News: पिंपरीत एक धक्कादायक घटना घडली आहे. 27 वर्षांच्या तरुणाने असं काही केलं की त्याच्या आईनेच त्याच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. आईने दिलेल्या तक्रारीनंतर सांगवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे निळख परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातही एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्निल पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मोरया क्षितिज इमारतीत स्वप्नील पवार हा कुटुंबासह राहतो. स्वप्नील हा उच्चशिक्षित आहे. स्वप्निल व्यसनाधीन असल्याने त्याला नशेसाठी पैसे लागतात. नेहमी तो आईकडून दारूसाठी पैसे घ्यायचा. मात्र, आईने पैसे न दिल्याच्या रागातून त्याने सोसायटीत मोठा गोंधळ घातला आहे.
नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याच्या रागातून त्याने सोसायटीत पार्क केलेल्या 13 दुचाकी जाळल्याची घटना घडवी आहे. हा सर्व प्रकार सोसायटीत लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 27 वर्षीय तरुणाला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल कुटुंबालादेखील नाहक त्रास देत होता. तसंच, जीवे मारण्याची धमकीदेखील देत असायचा. त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून आईने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.
दरम्यान, नाशिकमधील येवला येथेही असाच एक प्रकार घडला आहे. येवला तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत असलेल्या निमगाव मढ या ठिकाणी पोलीस गाडी घरी का बोलवली अशी शंका मनात धरून कैलास बाजीराव लबडे यांच्या मालकीची पल्सर मोटरसायकल पेटवून देण्यात आली यात मोटरसायकल संपूर्ण जळून खाक झाली आहे असून याप्रकरणी येवला तालुका पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस करत आहे.
नशेसाठी औषधांचा वापर
हडपसर पोलिसांनी तरुणांना नशा येणारी औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली. योगेश सुरेश राऊत आणि निसार चाँद शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी राऊत आणि शेख यांनी औषध निर्मिती अभ्यासक्रमाची पदवी नाही. तसेच त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाकडून दिला जाणारा परवाना नाही. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले
