मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा: मुंबई पुण्यासारख्या मेट्रो शहरात महिला अग्रेसर आहेतच मात्र बुलढाण्यासारख्या शहरातदेखील महिला एक पाऊल पुढे आहेत. याचे उदाहरण तुम्हाला बुलढाणा चिखली रोडवर पाहायला मिळेल. कारण एक जिद्दी आई आपल्या मुलाला चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी आणि पुढे ते आयएएस बनावा यासाठी ऑटो रिक्षा चालवते. रिजवाना शेख असे त्या आईच नाव आहे. या जिद्दी आईची प्रेरणादायी कहाणी जाणून घेऊया.
रिजवाना शेख या बुलढाण्यात राहतात. आपला मुलगा IAS व्हावा हे ध्येय त्यांनी उराशी बाळगलंय. कुटुंबाला हातभार लागावा यासाठी रिजवाना यांनी आतापर्यंत बरीच कामे केली. मात्र आता त्यांच्यापुढे ध्येय आहे ते आपल्या मुलाला आयएएस बनवायचे. त्यामुळे त्याला चांगल्या शाळेत शिकवावे लागणार हे त्यांना माहिती आहे. चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा म्हणजे लाखो रुपये डोनेशन द्यावे लागेल हे त्यांना माहिती झालंय. पतीचा पगार पुरत नाही म्हणून या ताईंनी ऑटो चालवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षभरापासून त्यांच्या रिक्षाची चाकं मुलांच्या शाळेची फी भरत आहेत. ऑटो रिक्षा चालवताना चांगले-वाईट सगळेच अनुभव येतात. मात्र रिजवाना त्या कशालाच घाबरत नाहीत. परिस्थितीशी दोन हात करत त्या ताठ मानेने हा व्यवसाय करतात. आमच्या समाजाच आणि पतीचा मोठं पाठबळ माझ्या पाठीशी असल्याचे त्या सांगतात.
मुलाला चांगल्या शाळेत शिकवण्यासाठी रिजवाना यांचे कष्ट कमालीचे आहेत. राजमाता जिजाऊंचा माहेरघर असलेला बुलढाणा जिल्ह्यात जिजाऊंच्या या लेकीने समाजासमोर एक आदर्श ठेवलाय, असे प्रवासी नेहा शेळके म्हणतात.
मोठ्या शहरात बरीच उदाहरणे पाहायला मिळतील मात्र बुलढाणा सरख्या ग्रामीण टच असलेल्या भागात रिजवाना शेख यांच्यासारख्या जिद्दी आणि ध्येयवादी महिला ऑटो रिक्षा चालवून आपल्या मुलाला IAS बनवण्याची स्वप्न पाहतात आणि त्यासाठी धडपड करतात हे अभिमानास्पद आहे.
