Fake Death Certificate Scam: घर, गाडी अशी मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोकं बॅंकेतून कर्ज घेतात. कर्ज मंजूर झाल्यावर स्वप्न तात्काळ पूर्ण होतं. पण पुढे अनेक वर्षे या कर्जाचा हफ्ता संबंधित कर्जदाराला भरावा लागतो. दरम्यान काही वर्षांनी हे कर्ज कसं कमी होईल, यासाठी योजनाबद्द गुंतवणूकीचे मार्ग काहीजण अवलंबतात. तर काहीजण कर्ज कायमचे मिटवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करतात. असाच प्रकार मालेगावात समोर आलाय.
बोगस मयत दाखवून कर्ज माफ करून घेण्याचा प्रकार
शासकीय कर्ज काढून ते बुडवण्यासाठी नानाविध क्लुप्त्या केल्या जातात. बँकांना फसवलं जात. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात मात्र काही अफलातूनच प्रकार समोर आला आहे. कर्जदारांनी चक्क मृत्यूचा दाखला बनवून घेत मयत दाखवून कर्ज माफ करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे.
हुबेहूब प्रमाणपत्र तयार
मालेगाव पोलिसांच्या ताब्यात असलेले सध्या दोन जीवलग गुन्हेगार मित्र आहेत. कुठल्या खंडणीच्या वा कुणाच्या गुन्ह्यात हे पोलिसांच्या अटकेत नाही तर चक्क स्वतःला जिवंतपणी मयत दाखवल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सूफियान मो दस्तगीर याने आपल्यावर असलेलं कर्ज आणि वसुलीची कुऱ्हाड थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःलाच मयत दाखवले. यासाठी बनावट मृत्युप्रमाणपत्र तयार केलं. त्यासाठी त्याने आपला मित्र मन्सूर अहमद सिराज अहमद याला कामाला लावले. त्याने एका मृत्यू प्रमाणपत्राचे डुप्लिकेट प्रमाणपत्र तयार करून त्यावर मोहम्मद दस्तगीर हा मयत असल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सही बारकोड संगणकाच्या सहाय्याने चित्रित करत हुबेहूब प्रमाणपत्र तयार केलं. पोलीस तपासामध्ये हा सर्व प्रकार समोर आला आहे.
पुरावे शोधण्याचे काम सुरू
मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्य भरात गाजत असताना बनवून पेपर्स तयार करणाऱ्यांमध्ये भीती दिसून येत नाही. याप्रकरणी मालेगावात शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी अजून काही पुरावे शोधण्याचे काम सुरू केले आहे. जन्म प्रमाणपत्रांमध्ये मालेगाव महापालिकेचे अधिकारी संगनमताने घोटाळा करत असल्याचे आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केलीय.
2900 जन्म प्रमाणपत्र रद्द
मालेगावात जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा समोर आला आहे. यामध्ये बांगलादेशी रोहिंग्यांना अशी प्रमाणपत्र दिले जात असल्याने जवळपास 2900 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहेत. आता हा नवीन प्रकार उघड झाल्याने मृत्यू प्रमाणपत्र ही तपासण्याची वेळ आली आहे.
