Uttan-Virar Sea Link Project: मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातीलच एक प्रकल्प म्हणजे उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पदेखील आहे. उत्तन-विरार सागरी सेतूबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्प जोडरस्त्याने वाढवणपर्यंत विस्तारास मान्यता देण्यात आली आहे.
मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्ग, एस.व्ही.रोड आणि लिंक रोड या प्रमुख मार्गावर क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरिमन पाईंट ते विरारपर्यंत विविध पायाभूत सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्यात येत आहे. याचबरोबर उत्तर दक्षिण जोडणी करत 24.35कि.मी.चा उत्तन-विरार सागरी सेतू बांधण्यात येणार असून तो पुढे वाढवण बंदरापर्यंत नेण्यासाठी जोडरस्ता तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेशकुमार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाची लांबी 55.12 किमी असून मुख्य सागरी सेतू 24.35 किमी लांबीचा असणार आहे. या प्रकल्पात 9.32 किमी लांबीचा उत्तन जोडरस्ता, 2.5 किमीचा वसई जोडरस्ता आणि 18.95 किमीचा विरार जोडरस्ता तयार करण्यात येणार असून आता तो वाढवण बंदरापर्यंत वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील उत्तर-दक्षिण रस्ता जोडणीचे काम सुरू असून दक्षिण किनारी रस्ता, वांद्रे वरळी सागरी सेतू, अटल सेतूचे काम पूर्ण झाले असून आरेंज गेट बोगदा, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, उत्तर किनारी मार्ग, दिल्ली-मुंबई महामार्ग, शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचबरोबर उत्तन विरार सागरी सेतू आणि विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबईतील प्रवास अखंड होणार असून वाहतुकीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे.
