MP Sanjay Raut Big Claim: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक खास ऑफर दिल्याचा दावा राऊत यांनी ‘सामना’मधील ‘रोखठोक’ सदरामधून केला आहे. मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या वाटाघाटीसंदर्भात थेट पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याची ऑफर राऊतांसमोर शाहांनी ठेवली होती असं राऊतांनी म्हटलं आहे.
“सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी…”
“वतनदाऱ्या मिळाव्यात म्हणून मराठी अस्मितेशी बेइमान होणाऱ्यांच्या फौजा आज महाराष्ट्रात उभ्या ठाकल्या आहेत. छत्रपती शिवराय व संभाजीराजांच्या काळात वतनासाठी लढाया व गद्दारी स्वकीयांनीच केली. आजही तशाच वतनांसाठी बेइमान दिल्लीत मुजरा झाडतात. उद्धव ठाकरे यांच्याशी भांडण सुरू करताना एकनाथ शिंदे यांच्यातला ‘मराठा’ जागा झाला. स्वाभिमानासाठी ‘उठाव’ केल्याची बोंब त्यांनी ठोकली. तो मराठा आज दिल्लीच्या शहांच्या पायाशी लोळण घेताना सरळ दिसतो. शिंदे यांचे आता नव्या संसारातही पटेनासे झाले. एकनाथ शिंदे हे शनिवारी, 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ‘वेस्टइन’ हॉटेलात ही भेट झाली. 57 आमदारांचा नेता अमित शहांच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता. ‘सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत’, असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले,” असा दावा राऊतांनी केला आहे.
राऊतांनी शिंदे आणि शाहांमधला संवाद सुद्धा सांगितला
“‘बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा’ हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत. शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता. त्या चर्चेचा तपशील बाहेर आला तो साधारण असाच आहे. या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच.
अमित शहा – क्या शिंदेजी, सुबह के चार बज रहे है, इतना क्या अर्जंट है?
शिंदे – आपको सब मालूम है, यहा क्या हो रहा है.
शहा – क्या हो रहा है?
शिंदे – माझी आणि माझ्या लोकांची कोंडी करण्याचे प्रयत्न उघडपणे सुरू आहेत.
शहा – ऐसा कैसा हो सकता है? मै देवेंद्र से बात करता हूं.
शिंदे – मुझे दबाने की, खतम करने की पुरी कोशिश हो रही है. आप के भरोसे हम आपके साथ आये. आपका वादा था, चुनाव के बाद भी मैं ही मुख्यमंत्री रहुंगा.
शहा – हमारे 125 लोग चुनकर आये, तो आप कैसा क्लेम कर सकते हो?
शिंदे – मेरे नेतृत्व में चुनाव हुवा.
शहा – नहीं, मोदीजी के चेहरे पर चुनाव हुवा. आप को क्या चाहिये बोलो; मै कोशिश करूंगा.
शिंदे – मुख्यमंत्री.
शहा – देखो भाई, वो ठीक नही है. अभी नही हो सकता. पार्टी का ही मुख्यमंत्री होगा.
शिंदे – मै क्या करूं?
शह- आप बीजेपी में मर्ज हो जाओ. आपका क्लेम सीएम पद पर तब रहेगा. बाहर का आदमी अब महाराष्ट्र का सीएम नही बनेगा. आपका रिस्पेक्ट हमने रखा है।
शिंदे – फिर हमारे पार्टी का क्या?
यावर ‘वो हमारे पे छोड दो. वो पार्टी हमनेही बनायी. आप चिंता मत करो.’ असे शहा यांनी सांगितले व ही पहाटेची बैठक संपवली. असे सांगणारे भाजपचेच लोक आहेत. महाराष्ट्राचे राजकारण हे अशा पद्धतीचे चालले आहे. प्रयागराजचा कुंभ संपला, पण महाराष्ट्राच्या राजकीय कुंभात पक्षांतराची चेंगराचेंगरी सुरूच आहे,” असं राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या अब्रूचे सध्याच्या दिल्लीश्वरांनी…
“चंद्रराव मोरे, गणोजी शिर्क्याचे राजकारण अजून चालू आहे. दिल्लीच्या ज्या औरंगजेबाच्या दरबारात मान वाकवायची नाही या केवळ एका स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर शिवछत्रपतींनी भर मोगल दरबारात प्राणांची पर्वा न करता मराठ्यांच्या अस्मितेचा भव्योदात्त आविष्कार प्रकट केला, त्याच दिल्लीपुढे महाराष्ट्र पहाटे चार वाजेपर्यंत ताटकळत उभा राहतो व झुकतो, याचे पाणी दिल्लीने जोखले. व्यक्तिगत स्वार्थ, सत्तेची चटक यांनी झपाटलेले कार्यकर्ते आणि नेते, सत्तेशिवाय जणू देशसेवाच शक्य नाही अशा तिरमिरीत सगळेच सैरावैरा धावत सुटले आहेत व ते प्रामुख्याने एकाच पक्षाच्या तंबूत शिरत आहेत. मोगलांना सर्व मराठे सामील होण्याचाच हा प्रकार आहे. महाराष्ट्रासाठी व मराठी माणसांसाठी स्थापन केलेली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शहांनी फोडली. ती शिंदेंच्या हातावर ठेवली. आज शिंदेंना मुख्यमंत्री पुन्हा व्हायचे म्हणून ती चोरलेली शिवसेना भाजपमध्ये विलीन करायला निघाले. महाराष्ट्राच्या अब्रूचे सध्याच्या दिल्लीश्वरांनी काढलेले यापेक्षा मोठे धिंडवडे कोणते असू शकतात!” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.
