
12 Railway Project In Maharashtra : रेल्वे हे प्रवासाचे जलद आणि सुलभ माध्यम आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. अशातच केंद्र सरकारने रेल्वेचा 162410000000 रुपयांचा महाप्रकल्प मंजूर केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील रखडलेले 12 नवीन रेल्वे मार्गी लागणार आहेत. या प्रकल्पाचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे. या प्रकल्पांचा उद्देश कनेक्टिव्हिटी वाढवणे आणि रेल्वेचे कामकाज अधिक सुरळीत करणे आहे.
मुंबई लोकलच्या वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने मुंबई उपनगरीय नेटवर्कमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी 16,241 कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. पावसाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत मुंबईमधील 16,241 कोटी रुपयांच्या 12 रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प मुंबईतील रेल्वेची कार्यक्षमता आणि कनेक्टिव्हिटी वाढवतील.
या प्रकल्पाअंतर्गत लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 238 नवीन एसी लोकल सुरु होणार आहेत. स्वयंचलित दरवाजांमुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढणार आहे. या प्रकल्पांमुळे पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवरील प्रवास सुधारतील आणि दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. सीएसएमटी, बोरिवली, विरार, कल्याण, बदलापूर, डहाणू यांसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश यामध्ये असून, शहरातील गर्दी नियंत्रणात येणार आहे.
विरार – डहाणू रोड रेल्वे
विरार ते डहाणू रोड दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकली जात आहे. 64 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असले. याचे काम एमयूटीपी-III अंतर्गत पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 3587 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
बोरिवली – विरार
बोरिवली ते विरार दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकली जात आहे. 26 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 2184 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याचे काम एमयूटीपी-III A अंतर्गत पूर्ण केले जात आहे.
गोरेगाव – बोरिवली विस्तारीत रेल्वे मार्ग
गोरेगाव बोरिवली पासून हार्बर लाइनचा विस्तार केला जाणार आहे. हा प्रकल्प सात किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यासाठी 826 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई सेंट्रल – बोरिवली रेल्वे
मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी लाईन टाकली जाणार असून यासाठी 919 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
सीएसएमटी – कुर्ला रेल्वे मार्ग
सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन टाकली जाणार आहे. 17.5 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 891 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
निळजे – कोपर
निळजे ते कोपर दरम्यानच्या पाच किलोमीटर लांबीवर डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार असून हा प्रकल्प 338 कोटी रुपयांचा आहे.
नायगाव – जुईचंद्र
नायगाव जुईचंद्र दरम्यान सहा किलोमीटर लांब डबल कॉर्ड लाईन टाकली जाणार आहे आणि यासाठी 176 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कल्याण – कसारा
कल्याण ते कसारा या 67 किलोमीटरचा मार्गावर तिसरी लाईन टाकली जाणार आहे. हा प्रकल्प 793 कोटींचा आहे.
कल्याण – बदलापूर
कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी लाईन टाकली जाणार आहे. या चौदा किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी 1510 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.