
पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन केंद्रासमोर मांजरी येथे एका भरधाव रिक्षाने धडक दिल्याने पादचारी महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत महिलेची ओळख लता किसन कारंडे (वय ४२) अशी झाली आहे. त्या कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, सोलापूर रस्ता येथील रहिवासी होत्या.
.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मयत महिलेचा मुलगा गौरव कारंडे (वय २१, रा. भिगवण, ता. इंदापूर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता कारंडे या पुणे-सोलापूर रस्त्यावरून जात असताना द्राक्ष संशोधन केंद्रासमोर रस्ता ओलांडत होत्या. याच वेळी एका भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या कारंडे यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर रिक्षाचालक घटनास्थळावरून पसार झाला. आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.