
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचं दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 20 जुलै रोजी राज्यात पावसाचे मिश्र स्वरूप बघायला मिळणार आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय होणार आहे. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे. अशातच हवामान खात्याने कोकण व घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात काह प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून गेली दोन दिवस ऊन पडत होते. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह उपनगरात रात्री हलक्या सर कोसळण्याची शक्यता आहे. जरी हवामान खात्याने मुंबईला कोणताही अलर्ट दिला नसला तरी नागरिकांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोकणात हलक्या व मध्यम पावसाची शक्यता
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. विशेषतः दक्षिण कोकणात पावसाची शक्यता असून किनारपट्टीवर प्रचंड आर्द्रतेमुळे दमट हवामान अनुभवायला मिळणार आहे. यावेळी समुद्रात ओहीटी पहाटे 00:48 वाजता 1.11 मीटर पर्यंत असणार आहे. तर भरती ही सकाळी 11.45 वाजता 3.95 मीटर इतकी असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला असून घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत हलक्यापासून ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विशेषतः घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. यावेळी पुण्याचे तापमान 25°C ते 30°C दरम्यान राहील. हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी राहणार
मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, लातूर, जालना या भागात केवळ तुरळक सरींची शक्यता असून, काही ठिकाणी आकाश पूर्णतः ढगाळ राहील. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे, परंतु पावसाची तीव्रता कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यभरात विविधतेने भरलेले हवामान पाहता, नागरिकांनी स्थानिक हवामान खात्याचे अपडेट्स लक्षात घेत सतर्क राहावे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.