
Manikrao Kokate found playing rummy in Assembly : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि वाद हे जणू समिकरणच बनलंय की काय? अशी चर्चा आता सुरू झाली. कारण जेव्हा जेव्हा माणिकराव कोकाटे बोलतात तेव्हा तेव्हा वाद निर्माण झाला असं समजाच. दरम्यान आता कोकाटे बोलले देखील नाहीत, तरीही मोठा वाद निर्माण झालाय. माणिकराव कोकाटेंच्या एका कृतीमुळे राज्यात चांगलंच राजकारण पेटलंय माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ शऱद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी ट्विट केलाय. यानंतर माणिकराव कोकाटेंवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठतेय.
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असतानासुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणा-या शेतक-यांची ‘कभी गरीब किसानों कीं खेतीपर भी आओ ना महाराज’ ही आर्त हाक ऐकू येईल का? रोहित पवारांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंवर चांगलीच आगपाखड केलीय.
राज्यात 650 शेतक-यांनी आत्महत्या केलीय.. मात्र, कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यक्त असल्याची टीका राऊतांनी केलीय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी मात्र, कोकाटेंचं समर्थन करताना एक अजब वक्तव्य केलंय. माणिकराव कोकाटे पहिल्यांदा वादात सापडले नाहीयेत. या आधीही अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे त्यांच्यासह त्यांच्या पक्षाची कोंडी झालीय. मात्र, पुन्हा एकदा कोकाटे वादात सापडले आहेत. त्यामुळे विरोधकांना देखील त्यांच्यावर टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे.
काँग्रेसनं देखील माणिकराव कोकाटेंना धारेवर धरलंय. शेतकरी मरतोय आणि कृषीमंत्री रमी खेळतोय असं म्हणत वडेट्टीवारांनी त्याचा खरपूस समाचार घेतला. तर येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी मंत्रिमंडळाची अवस्था झाल्याचा हल्लाबोल सुषमा अंधारेंनी केला आहे. दरम्यान या सर्व वादावर माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंय.मोबाईलवर रमीची जाहिरात आली होती ती स्कीप करतानाचा तो व्हिडिओ आहे. तसंच माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप देखील माणिकराव कोकाटेंनी केला आहे.
जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी लोकप्रतिनिधींना लोकशाहिच्या मंदिरात पाठवलं जात. त्याच लोकशाहीच्या मंदिरात मंत्री रमी खेळत असतील तर जनतेनं कोणाकडून अपेक्षा करायच्यात. राज्यात शेतक-यांना खतं मिळत नाहीयेत. कुठे पाऊस न पडल्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीची वेळ आलीय. तर कुठे शेतकरी आत्महत्या करतोय. मात्र, राज्याचे कृषीमंत्र्यांचं याकडे लक्ष नसून ते विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे माय-बाप शेतक-यांनी कुणाकडून अपेक्षा करायच्यात असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.