
Sharad Pawar NCP On Manikrao Kokate Rummy Video: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून त्यावरुन आता टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रकरणावरुन आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली असून थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या आमदाराने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोकाटेंचा ‘बेशरम’, ‘निर्ल्लज’ असा उल्लेख केला आहे.
खिल्ली उडावणारी पोस्ट
शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटांचा विधानसभेत रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांची खिल्ली उडावणारा एक फोटो आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन शेअर केला आहे. त्यापूर्वी त्यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना कोकाटेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली.
ज्या रमीमुळे 3 ते 4 पोरांनी आत्महत्या केली
“बेशरम, निर्ल्लज माणूस आहे तो (माणिकराव कोकाटे). एकीकडे हाहाकार माजला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे सरकार किती खोटं आहे हे शेतकऱ्यांमध्ये पसरलं आहे. एक माणूस परिस्थितीमुळे नांगर खांद्यावरुन ओढताना दिसत आहे. हे सगळं होत असताना, उद्धटपणाने वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळताना दिसत आहेत. ज्या रमीमुळे 3 ते 4 पोरांनी आत्महत्या केली. जुगार हा गुन्हा आहे. मंत्री विधानसभेत जुगार खेळताना दिसतोय,” असं म्हणत आव्हाड यांनी माणिकराव कोकाटेंवर टीका केली. पुढे आव्हाड यांनी अजित पवार काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ‘त्यावेळी मी कोणाला तरी…’; विधानसभेत रमी खेळत असल्याच्या Video वर कृषीमंत्री कोकाटेंचं स्पष्टीकरण
रमी मास्टर कृषीमंत्री
आव्हाडांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ‘रम्मी मास्टर कृषीमंत्री’ असा मथळा लिहिलेला आहे. या फोटोमध्ये माणिकराव कोकाटेंच्या हातात मोबाईल दाखवण्यात आला आहे. कोकाटेंनी फेटा परिधान केला असून हसताना दिसत आहेत. त्यांच्या हातातील मोबाईलमध्ये, ‘विसरा शेती, खेळा रमी, मिळणार नाही शेतमालाची हमी,’ असं लिहिलेलं असून खाली पत्ते दाखवण्यात आले आहेत. फोटोमध्ये मागील बाजूला काही लोक रमी खेळताना दाखवण्यात आलेत. हा फोटो आव्हाड यांनी, ‘शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी…’ अशा कॅप्शनसहीत शेअर केला आहे.
अजित पवारांचा उल्लेख करत साधला निशाणा
“आता बघूयात जगाला शिस्त शिकवणारे, शिस्तप्रिय अजित पवार आता काय करतात. दुपारच्या आत त्यांच्या राजीनामा घ्यायला हवा,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. “भाजपाचा आमदार मकोकाचे आरोपी घेऊन येतो. मारण्यासाठी खाणाखुणा करतो. आत त्यांचे लोक जाऊन मारतात. हे सरकार म्हणजे केवळ गुंडाराज, जंगलीराज आहे की काय?” असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.