
Agriculture Minister Playing Online Rummy: महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेच्या सभागृहामधील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेच्या सभागृहात चक्क रमी खेळत असताना दिसत आहे. हा व्हिडीओ शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शेअर केला असून एकीकडे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषीमंत्री मात्र रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं म्हटलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
विधानसभेच्या सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे हे त्यांच्या मोबाईल रमी गेम खेळताना दिसत आहेत. सभागृहातच आपल्या जागेवर बसून मान खाली घालून कोकाटे रमी खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ कोकाटेंच्या मागील बाजूस बसलेल्या एखाद्या व्यक्तीने काढल्याचं व्हिडीओ पाहिल्यावर स्पष्ट होत आहे. सदर व्हिडीओ विधानसभेच्या गॅलरीतून काढला असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
रोहित पवारांनी कठोर शब्दांमध्ये साधला निशाणा
रोहित पवारांनी कोकाटे रमी खेळत असल्याचा एक फोटो आणि व्हिडीओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी कठोर शब्दांमध्ये कोकाटेंवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. “सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी,” असा टोला रोहित पवार यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमधून लगावला आहे
रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना…
“रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?” असा सवालही रोहित पवारांनी विचारला आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी, ‘#कधी_शेतीवर_या_महाराज’, ‘#खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या’ असे दोन हॅशटॅग वापरले आहेत. आता या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याचं चिन्ह दिसत आहे. या व्हिडीओमधून राज्यकर्ते गंभीर प्रश्नांबद्दल संवेदनशील नाहीत अशी टीका होताना दिसत आहे.