
Suraj Chavan vs Chhava Sanghatana: अजित पवार यांच्या युवक प्रदेशाध्यक्षाची कार्यकर्त्यांना मारहाण. रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून सूरज चव्हाण यांनी कोपर, बुक्क्यांनी मारलं. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर लातूरमध्ये मोठा राडा झाला.
लातूरमधील घटनेचा विरोधकांकडून निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला आहे. यानंतर लातूरमधील घटनेचे आज राज्यभर पडसात उमटत असल्याचे बघायला मिळत आहे.
‘सूरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा’
अशातच सूरज चव्हाणांना ताबडतोब अटक करा. ही गुंडगिरी आता आम्ही खपवून घेणार नाही. कृषीमंत्री अधिवेशनात ऑनलाइन रमी खेळतात आणि लोकांना राग येऊन त्यांनी निषेध व्यक्त केला तर त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत ही गुंड प्रवृत्तीची लोकं मारणार? आणि ते सूरज चव्हाण ह्या माणसाची इतकी मजाल की, ह्या घटनेनंतर ते एका मराठी माध्यमाशी बोलतांना म्हणतात की त्या लोकांनी ‘असंविधानिक’ भाषा वापरली? म्हणून तुम्ही मारहाण करणार? मग मारहाण करणे हे कृत्य संविधानिक आहे? तुम्हाला संविधान या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? अस म्हणत तातडीने त्या सूरज चव्हाणांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
मारहाणीबाबत सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त
लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाणीबाबत सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमच्या वरिष्ठांबाबत असंवैधानिक शब्दांचा वापर केला होता म्हणून आमच्याकडून हे कृत्य घडलं. मात्र झालेल्या हाणामारीबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक
छावा संघटनेच्या कार्यकर्ते विजयकुमार घाडगे यांना मारहाण झाल्यानंतर नंदी स्टॉप परिसरातील अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे फोटो असलेले बॅनर फाडले. या प्रकरणाचे पडसाद आता ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत. छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनेक ठिकाणी लातूरमध्ये लागलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बॅनर फाडले आहेत.
मारहाणीच्या निषेधार्थ लातूर शहर बंद
विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सर्व मारहाणीची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा छावा संघटना जशास तसे उत्तर देईल असा इशारा छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, मारहाण झालेले विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर लातुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती कळल्यानंतर छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्ष आणि संघटनांतील पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विजयकुमार घाडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.