
Suraj Chavan Arrest: विजयकुमार घाडगे मारहाणप्रकरणी सूरज चव्हाणांनी राजीनामा दिलाय. अजित पवारांच्या निर्देशानंतर चव्हाणांनी राजीनामा दिलाय. दरम्यान सूरज चव्हाणांविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी छावा संघटना आणि विरोधकांनी केलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात मारहाणीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. रविवारी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाणांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाटगेंना जबर मारहाण करत जखमी केलंय. दरम्यान यानंतर चांगलंच राजकारण पेटल्यानं राष्ट्रवादीनं सूरज चव्हाणांचा राजीनामा घेतलाय. लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत कोकाटेंच्या मुद्द्यावरून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना निवेदन दिलं होतं. तसंच तटकरेंच्या समोर पत्ते देखील फेकले होते. दरम्यान यानंतर सूरज चव्हाणांनी विजय घाडगेंना रक्त निघेपर्यंत मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूरज चव्हाणांनी केलेल्या मारहाणीनंतर अजित पवारांनी देखील निषेध व्यक्त केलाय. तसंच कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना देखील अजित पवारांनी इशारा दिलाय.
लातूरच्या राड्याचा निषेध
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिका-यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि
भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो. माझ्या सर्व सहका-यांना आणि कार्यकर्त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की, ‘सामाजिक जीवनात काम करताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा मुल्यांना प्राधान्य द्या.’
‘जाब विचारल्यामुळे मारहाण’
मारहाणीच्या घटनेनंतर चहू बाजूंनी होत असलेल्या टीकेनंतर सूरज चव्हाणांनी मारहाणीच्या घटनेवर स्पष्टीकरण दिलंय. विजय घाडगेंनी असंवैधानिक भाषा वापरल्यामुळे जशासं तसंच उत्तर दिल्याचं सूरज चव्हाणांनी सांगितलं. तर शेतक-यांच्या प्रश्नावर जाब विचारल्यामुळे राष्ट्रवादीच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप विजय घाडगेंनी केलाय.
सूरज चव्हाणांना उपरती
पक्षश्रेष्ठींकडून तंबी मिळाल्यानंतर सूरज चव्हाणांना उपरती आलीय. घटनेसंदर्भात सूरज चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. तर दुसरीकडे विरोधकांनी सूरज चव्हाणांना चांगलंच घेरलंय. काहींना सत्तेचा माज आणि अहंकार असल्याचा हल्लाबोल रोहित पवारांनी केलाय.
महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय?
मारहाणीची घटना चुकीची असल्याचं भाजपनं म्हटलंय. मारामारी करून कोणीही कायदा हातात घेऊ नये असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलंय. तर राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफांनी देखील या घटनेचा निषेध केलाय. आधी संजय गायकवाड, त्यानंतर विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्ते भिडले आणि आता सूरज चव्हाणांकडून मारहाण यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय? असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय.