
Aaditya Thackeray On Meeting CM Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही वेगळा प्रयोग पुन्हा पाहायला मिळतो की काय अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांच्या बाकावर येण्याची ऑफर विधानभवनामध्ये दिल्यानंतर आता शनिवारी रात्री मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. या कथित भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र असं असलं तरी या कथित भेटीसंदर्भात विचारलं असता आदित्य यांनी सूचक प्रतिक्रिया नोंदवताना अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
कुठे भेटले हे दोन्ही नेते?
मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे शनिवारी रात्री मुंबईमधील वांद्रे-कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसीमधील सोफिटेल हॉटेलमध्ये उपस्थित होते. त्यामुळेच हे दोघे भेटल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणांसाठी इथं उपस्थित होते असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त बैठक शनिवारी रात्री झाल्याची चर्चा आहे. या हॉटेलच्या सातव्या मजल्यावर दोघांची बैठक झाली. दोन तास ही बैठक झाल्याचा दावा केला जातोय. असं असतानाच या भेटीसंदर्भात आदित्य ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला
“माझ्या मित्रांसोबत मी आलो होतो. आमचा डीनरचा प्लान होता. त्याच्यासोबत संगीताचा कार्यक्रम पूर्ण अटेंड करूनच बाहेर आलो. माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीच्या बातम्या ऐकत होतो. मात्र एक व्यक्ती आता या बातम्या बघून गावी जाईल असं वाटतंय,” असा टोला आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा थेट उल्लेख न करता लगावला गेला.
फडणवीसांना भेटलात का? प्रश्नावर चार शब्दात उत्तर
“तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलात का?” हे विचारताच यावर बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं. “चालतंय ते चालू द्या!” असं बोलून आदित्य ठाकरे निघून गेले.
काही तरी वेगळं शितजंय?
शनिवारी झालेल्या या कार्यक्रमाबद्दल केल्या जात असलेल्या दाव्यांनुसार, आदित्य कार्यक्रमातून निघत असताना देवेंद्र फडणवीसांसाठी थांबले होते. एवढंच नाही तर, “तुम्ही ऑफर दिली म्हणून मी स्वागताला थांबलो,” असंही त्यांनी चेष्टेनं म्हटल्याचं सांगितलं जातं. ठाकरे-फडणवीसांच्या नात्यात सहजपणा आलेला असतानाच उद्धव ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतल्याचं काही दिवसांपूर्वीच दिसून आलं. एवढंच नव्हे तर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाल्याचंही सांगितलं गेलं. चर्चेचा तपशील बाहेर आला नसला तरी या दोघांच्या भेटीत राजकीय वातावरण मात्र तापलेलं दिसत आहे. राजकारणात जे दिसतं तसं काहीच नसतं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी औपचारिक असल्याचं सांगण्यात आलं तरी आतमध्ये काहीतरी वेगळंच शिजत असल्याची चर्चा दिसतेय.