
MNS letter to Pune Municipality: महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला राज्यातून कडाडून विरोध केला आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा निर्णय मराठी अस्मितेवर हल्ला असल्याचं म्हटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुरुवातीपासूनच या भूमिकेच्या विरोधात आक्रमक पाहायला मिळाली. सरकारने निर्णय मागे न घेतल्यास ‘संघर्ष अटळ’ असे संबोधत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. मनसेने या विरोधात आंदोलन उभारले असून सरकारच्या या धोरणाला मराठी भाषा आणि संस्कृतीला धोका मानले आहे. मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा एकदा आव्हान दिले. दरम्यान मराठी भाषेसंदर्भात मनसेकडून नवी मागणी करण्यात आली आहे.
‘पालिका हद्दीतील इमारतींना मराठीत नावं द्या’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मनसेकडून पुणे पालिकेच्या इंजिनीअर्सना यासंदर्भात पत्र लिहिण्यात आलंय. इमारत बांधकाम परवानगी देतानाच मराठीत नाव द्या. पालिका हद्दीतील नव्याने होणाऱ्या इमारतींना मराठीत नावं असावीत. बांधकाम परवानगी देतानाच मराठीत नाव देणं बंधनकारक करावं, असं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलंय.
मनसे पदाधिकारी प्रशांत कनोजियाने यासंदर्भात शहर अभियंतांना लेखी निवेदन दिलंय.पालिकेच्या अटी शर्तींमधेच मराठी नामफलक सक्तीचा उल्लेख असावा.मनसेची पालिकेकडून मराठी आग्रहाची भूमिका मांडण्यात आली आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
हिंदीसक्तीच्या विरोधात मीरा रोडच्या सभेत राज ठाकरेंचे आक्रमक रुप पाहायला मिळाले. महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करुन बघा. दुकानं नाही शाळाही बंद करीन. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय. इतर ठिकाणी मराठी सक्तीची करायला हवं. ते सोडून हिंदी सक्ती करताय. कोण दबाव टाकतंय तुमच्यावर. केंद्राचं हे पुर्वीपासून आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून हे सुरु आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव गुजरात्यांचा होता. यासाठी पहिलं विधान वल्लभभाई पटेलांनी केलं. ज्यांना आम्ही लोहपुरुष म्हणून पाहत आलो, त्यांनी महाराष्ट्राल विरोध केलाय. गोळीबार करुन महाराष्ट्रात लोकांना ठार मारले होते. गेले अनेक वर्षे होतोय. हे सहज होत नाही. हे चाचपडून बघतायत. हिंदी भाषा आणली की बघू मराठी माणूस जिवंत आहे का. हिंदी ही पहिली पायरी आहे. हळुहळू मुंबई घ्यायची आणि गुजरातला मिळवायची हे यांचं कारस्थान असल्याचे ते म्हणाले.
हिंदीला 200 वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अडीच ते 3हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. दर्जा दिल्यास वर्ष झालं पण एक रुपया नाही आलाय. अभिजात भाषेसाठी कमीत कमी 1400 वर्षे असावी लागतात. म्हणजे हिंदीला यासाठी 1200 वर्षे आहेत. ती भाषा तुम्ही आमच्या मुलांना सक्तीची करताय. हिंदीमुळे फक्त सिनेसृष्टीतील कलाकाराचं भलं झालं, अजून कोणाचं झालं? हिंदीने काय भलं केलं तुमचं? या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. यामागचं मला कारणंच नाही कळालं. हिंदी ही या देशात कोणाचीच मातृभाषा नाही. ज्याला कानफाटीत मारलं त्याला विचारा तुझी मातृभाषा कोणती? 200-300 वर्षापुर्वी आलेली भाषा. हिंदीने 250 च्या आसपास भाषा मारल्याचेही राज ठाकरे म्हणाले. जगातली कोणतीही भाषा वाईट नसते. आमच्यावर लादणार असाल ततर नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवर तर नाहीच नाही. आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे. हिंदुत्वाच्या बुरख्याखाली तुम्ही माझी मराठी संपवत असाल तर माझ्यासारखा कडवट तुम्हाला सापडणार नाही. हे सगळ षढयंत्र समजून घ्या, असे आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केले.