
Maharashtra Weather News : हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये शहरासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तर पावसाची हजेरी असेल, शिवाय पुढच्या तीन तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. दरम्यान गेल्या 24 तासांपासून रायगड जिल्ह्यात सर्वच भागात रिमझिम पाऊस सुरू आहे तर, अधून मधून एखादी मध्यम सर हजेरी लावत आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरीत भागात मुसळधार पावसाची हजेरी असेल. साधारण 27 जुलैपर्यंत पावसाचे हेच तालरंग पाहायला मिळणार असून, सूर्यदर्शन इतक्यात शक्य नसल्याचच स्पष्ट होत आहे. तर काळ्या ढगांची दाटी आणि विजांचा कडकडाट भीतीत भर टाकत आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या.” pic.twitter.com/9w6fQvPDzc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 22, 2025
हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील अंतर्गत भाग आणि उत्तर कोकणामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतरा असेल. कोकणाचा दक्षिण भाग आणि गोव्याच्या किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाझणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रालाही पावसाच्या जोरदार सरी झोडपणार आहेत. यादरम्यान घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची हजेरी असेल ज्यामुळं कोकणासह घाटमाथ्यावरही पावसाचा ऑरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात कोणत्या भागांना पावसानं झोडपलं?
वाशिमच्या मालेगावमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे काटेपूर्णा नदीला पूर आला असून, त्यामुळे नदीवरील पुलावर पाणी आल्याने कुत्तरडोह गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यसेवा आणि बाजारपेठेत जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे.
तर, हिंगोलीच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं यामुळे सेनगाव तालुक्यातील सरस्वती नदीला मोठा पूर आलाय. परिणामी सेनगाव आणि मंठा तालुक्याचा संपर्क तुटलाय, तर बरडा शिवारात असलेल्या महादेव मंदिराला पुराचा वेढा पडल्याने या मंदिरातील सेवेकरी महाराज आणि इतर दोघेजण मंदिराच्या छतावर अडकले होते.
तिथं चंद्रपुरात दडी मारलेला पाऊस आता परतला असून शहर आणि जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली होती…या पावसाने चंद्रपूरकर सुखावले आहेत.