
Yavatmal Crime News: यवतमाळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण कुटुंबाला संपवण्यासाठी आरोपींनी भयंकर कट रचला होता. या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिचा पती थोडक्यात बचावला आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंजी नाईक गावात ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका घराभोवती करंट देऊन संपूर्ण कुटुंबच संपवण्याचा कच रचण्यात आला होता. यात एक महिला ठार झाली असून तर तिचा पती थोडक्यात बचावला आहे. परंपरागत राजकीय वैमनस्यातून वचपा काढण्यासाठी हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती समोर येतेय.
आरोपीनीं चक्क विरोधकाच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला. यात 37 वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला तर तिचा पती थोडक्यात बचावला. सविता पवार असे मृत महिलेचे नाव आहे. पवार कुटुंब घरी झोपले असताना, पहाटेच्या सुमारास सविता लघुशंकेसाठी उठल्या. तेव्हा त्या घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक जागेवर कोसळल्या. त्यांच्या आवाजाने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला. आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले.
रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सविताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मनेश पवार यांच्या तक्रारीवरुन घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीने केला पत्नीचा खून
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात पतीनेच पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. हातुर गावातील आनंद तांडाच्या परिसरात ही घटना घडली आहे. पत्नी शेतात कामासाठी येत नसल्याचा राग मनात धरुन पतीने तिचा खून केला आहे. पत्नीच्या डोक्यात फरशी घालून तिची हत्या करण्यात आली आहे. गौराबाई पाटील असं मृत महिलेचे नाव आहे. यासंदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.