
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा घोळ झाल्याच सध्या समोर येत आहे. ज्यामध्ये तब्बल 26.34 लाख अपात्र लाभार्थी या योजनेचा गैरफायदा घेत असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की, या अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून २०२५ पासून स्थगित करण्यात आला आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने एक विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवण्यात आली. माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार 26.34 लाख लाभार्थी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली.
लाडक्या बहिणीसाठी पुरुषांनी केले होते अर्ज
एका माध्यमाने यापूर्वीच या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा लाभ काही पुरुषांनीही घेतल्याचे उघड झाले होते. याशिवाय अनेक अर्जदार एका पेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत होते. तर काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी होते. अशा विविध अनियमितता आढळून आल्या होत्या.
त्यामुळे या योजनेत पुरुषांकडून होणारी ही फसवणूक समोर आल्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलली असून 26.34 लाख अपात्र लाभार्थ्यांचा लाभ जून 2025 पासून स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसरीकडे 2.25 कोटी पात्र लाभार्थ्यांना योजनेचा सन्माननिधी वितरित करण्यात आला असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
तात्पुरती स्थगिती, पुन्हा तपासणी होणार
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचा लाभ स्थगित करण्यात आला आहे अशा अर्जांची जिल्हाधिकारी स्तरावर शहानिशा करण्यात येणार आहे. त्यानंतर जे अर्जदार खरोखर पात्र ठरतील त्यांना पुन्हा लाभ देण्यात येईल. ही केवळ तात्पुरती स्थगिती देण्यात आली असून अंतिम निर्णय तपासणीनंतरच घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या बनावट लाभार्थ्यांविरोधात कारवाई करायची की नाही यावर देखील निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.