
Dhananjay Munde News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख्य हत्या प्रकरणी कारागृहात असणाऱ्या वाल्मिक कराडशी जवळीक असल्या कारणानं राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे नेते धनंजय मुंडे हेसुद्धा टीकेचे धनी ठरले आणि याच वादादरम्यान त्यांची मंत्रीपदाची खुर्ची गेली. दरम्यानच्या काळात विविध कारणांनी त्यांचं नाव चर्चेत राहिलं आणि अप्रत्यक्षरित्या याच काळाचा उल्लेख करताना आपण नेमक्या कोणत्या आव्हानात्मक स्थितीला सामोरं गेलो याचा गौप्यस्फोट मुंडे यांनी नुकताच एका कार्यक्रमादरम्यान केला.
सर्वांचच लक्ष वेधलं जाईल असं काय म्हणाले धनंजय मुंडे?
‘धनंजय मुंडे चुकला, तर त्याला माफ करू नये; पण तो विषय धनंजय मुंडेपर्यंतच हवा. धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, जिल्हा, आई- वडील मुला-बाळांपर्यंत नसावा. जगाच्या पाठीवर कोणत्याही घटनेची, व्यक्तीची, जिल्ह्याची, जातीची बदनामी 200 दिवस झाली नसेल. ती मी सहन केली. त्या दोनशे दिवसांत दोन वेळा मरता मरता वाचलो’, असं म्हणत या सर्व गोष्टी फक्त डॉ. तात्याराव लहाने यांनाच ठाऊक असल्याचा गौप्यस्फोट धनंजय मुंडे यांनी केलाय. ठाण्यामध्ये आयोजित वंजारी समाजाच्या मेळाव्यादरम्यान ते बोलत होते.
आपण ज्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेलो त्यावर भाष्य करत असताना प्रत्यक्षात संघर्ष काय असतो तो आपण गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनात पाहिला, असं सांगताना आपल्या समाजाच्या संघर्षावरही त्यांनी उजेड टाकला. ‘माझ्या जीवनातील प्रवास आठवतानाही अंगावर शहाये येतात. मला समाजानं किती शिव्या दिल्या हे मला माहित. पण, तेव्हा मुळात परिस्थितीचीच ती भावना होती’, असं म्हणत संघर्ष माझा होता आणि त्यातूनच बदल घडला असं सांगताना हा संघर्षाचा विजय असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.
ते 200 दिवस आणि धनंजय मुंडे….. नेमकं काय घडलं?
ज्या 200 दिवसांचा उल्लेख मुंडेंनी केला त्यासंदर्भात म्हणताना त्यांनी पुढे सांगितलं, ‘त्या 200 दिवसांत कधी बोलावं आणि कधी बोलू नये हे मी शिकत गेलो. आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटावेळी समाज माझ्या पाठीशी उभा राहिला’, असं सांगताना आपण मौन होतो, मात्र ते केलंच नाही त्यावर प्रतिक्रिया का द्यावी असा प्रतिप्रश्न त्यांनी मांडला. आपण जर त्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली असती तर त्यातून आणखी प्रश्नांनी डोकं वर काढलं असलं असं धनंजयमुंडे म्हणत आपल्यावर कृषीमंत्रीपदी असताना झालेल्या आरोपांवर न्यायव्यवस्थेनं न्याय दिला असल्याची बाब त्यांनी लक्षात आणून दिली.