
मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध हवेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप झाला की पहिल्यांदा जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे. सद्यस्थितीत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सत्ताध
.
कृषि खात्यातील कथित घोटाळा व बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा राईट हँड मानल्या जाणाऱ्या वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.
मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असावेत
पत्रकारांनी शुक्रवारी अहिल्यानगर येथे अण्णा हजारे यांना धनंजय मुंडे व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांविषयी विचारणा केली. त्यावर अण्णा हजारे या दोघांचेही नाव न घेता म्हणाले, मंत्रिमंडळात असणाऱ्या मंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम जबाबदारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. यामुळे स्वतःचीच प्रतिमा निर्मिती होते. कारण, जनता आपल्याकडे पाहून अनुकरण करते. त्यामुळे तुम्हीच वाट सोडून जात असाल तर जनता कुठे जाणार? अशा लोकांना मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी विचार करण्याची गरज आहे.
मंत्र्यांचे आचार-विचार शुद्ध असावेत. सुरुवातीला हे चुकले की नंतर अशा घटना घडता.. त्यामुळे राज्याचे, समाजाचे व पर्यायाने देशाचे नुकसान होते. यावर विचार करण्याची गरज आहे. अण्णा हजारे यांनी या विधानाद्वारे धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्षपणे राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता मुंडे त्यांचा सल्ला मानणार काय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवारांच्या विधानामुळे मुंडेंची कोंडी
उल्लेखनीय बाब म्हणजे धनंजय मुंडे यांनी आपल्या राजीनाम्याचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपवला आहे. तर अजित पवार यांनी हा मुद्दा मुंडेंच्याच कोर्टात टोलवला आहे. यामु्ळे त्यांची कोंडी झाली आहे. पत्रकारांनी अजित पवारांना धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याची नैतिकता का दाखवत नाहीत? असा प्रश्न केला असता त्यांनी हा प्रश्न तुम्ही धनंजय मुंडे यांनाच विचारा असा उलटप्रश्न केला होता. ते मुंडेंना उद्देशून म्हणाले होते की, त्यांचे म्हणणे आहे की, यात माझा काही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. आम्ही अजिबात कुणाला वाचवणार नाही. जनतेने कुणाला वाचवण्यासाठी आमचे 237 आमदार निवडून दिले नाहीत. आम्हाला चांगले काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यानुसार आम्ही चांगले काम करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले होते.