
FASTag Update New Rule: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हणजेच एनएचएआयने फास्टटॅगसंदर्भात नवा नियम लागू केला आहे. या नव्या नियमामुळे टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी कमी होईल असं सांगितला जात असून हा नवा नियम फास्टटॅग ब्लॅक लिस्ट करण्यासंदर्भात म्हणजेच फास्टटॅग काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात आहे. फास्टटॅगसंदर्भात काही वाहनचालकांना असलेल्या एका अत्यंत चुकीच्या सवयीवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
नेमकं हे प्रकरण काय?
अनेकदा टोलनाका असलेल्या महामार्गावर प्रवास करताना काही वाहनचालक वाहनाच्या दर्शनी भागी असलेल्या काचेवर म्हणजेच विंडशिल्डवर ‘फास्टॅग’चं स्टीकर लावत नाही. अनेकदा असे वाहनचालक आपल्याकडी ‘फास्टॅग’चा स्टीकर हातात घेऊन दाखवितात. मात्र आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विंडशिल्डवर फास्टटॅगचा स्ट्रीकर न लावणाऱ्या अथवा तो हातात धरुन दाखवणाऱ्या वाहनचालकांचे ‘फास्टॅग’ काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. याबाबत नवा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमामुळे टोलनाक्यावरील गर्दी कमी होण्याबरोबरच गैरप्रकारही रोखण्यात यश येईल, असा दावा करण्यात आला आहे.
अशा फॅस्टटॅगमधून कशी केली जाते फसवणूक?
नवीन नियमानुसार ‘फास्टॅग’ स्टीकर हातात धरून स्कॅन करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. टोलनाका सेंटरवर अशा ‘फास्टॅग’ची तक्रार करून, तो ‘फास्टॅग’ पुन्हा वापरता येणार नाही किंवा वाहन कोणत्याही अडचणीशिवाय पुढील टोलनाक्यावरुन पास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच हलक्या वाहनांची नोंदणी असलेले ‘फास्टॅग’ अवजड वाहनांसाठी वापरले जातात. त्यामुळे टोलनाक्यावर चुकीचे स्कॅन होऊन कमी पैसे आकारले जातात. असे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ दिसताच त्याची तक्रार करून त्यांना काळ्या यादीत टाकता येईल, असे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ म्हणजे काय ?
‘फास्टॅग’ वाहनाच्या समोरील काचेवर न चिकटवता, वाहनचालक ते हातात घेऊन टोल स्कॅनरसमोर दाखवतात. याला ‘टॅग इन हॅड’ किंवा ‘लूज फास्टॅग’ म्हणतात. काही वाहनचालक जाणूनबुजून वाहनाच्या काचेवर ‘फास्टॅग’ चिकटवत नाहीत. त्यामुळे टोल भरताना अडचणी येतात. टोल नाक्यावर आपला क्रमांक आल्यावर अनेकजण हातात फास्टटॅग घेऊन तो योग्य जागी ठेऊन स्कॅन करण्याचा द्राविडीप्राणायाम करताना पाहायला मिळतात. परिणामी, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. एकाच्या चुकीमुळे सर्व वाहनचालकांना विलंब सहन करावा लागतो. हीच सवय मोडण्यासाठी आता नवा नियम लागू करण्यात आला आहे.
तक्रारीसाठी इ-मेल आयडी
‘फास्टॅग’चा चुकीच्या पद्धतीने वापर करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठी एनएचएआयने एक इ-मेल आयडी तयार केला आहे. टोलनाक्यावरील केंद्रावरील कर्मचाऱ्यांना या ई-मेलवर संबंधित फास्टॅग धारकांची तक्रार करता येईल. त्यानंतर एनएचएआयद्वारे त्या ‘फास्टॅग’ धारकाचे ‘फास्टॅग’ काळ्या यादीत टाकून त्वरित कारवाई केली जाईल.