Badlapur to Karjat Train Extension of third and fourth tracks: मध्य रेल्वेचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार होणार आहे. तिसरी चौथी रेल्वे मार्गिका बदलापूर ते कर्जत या दरम्यान प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. हा 32.460 किमी लांबीचा ब्राउनफिल्ड प्रकल्प आहे.
बदलापूरच्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला अखेर गती मिळणार आहे. ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार प्रकल्पाबबात अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ‘पीएम गतिशक्ती’ अंतर्गत ‘नेटवर्क प्लॅनिंग गटा’च्या ’89व्या’ बैठकीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांविषयी चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला हजर होते.
यावेळी बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्तार आणि कार्यक्षमता सुधारण्याचा निर्णय घेण्यात आला. 32.460 किमी लांबीच्या या ब्राउनफिल्ड प्रकल्पामुळे मुंबई-पुणे-सोलापूर-वाडी-चेन्नई मार्गावरील वाढत्या प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे होणाऱ्या विलंब टळणार आहे, बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी आणि कर्जत स्थानकादरम्यान प्रवास करणारे प्रवासी तसेच मालवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांच्या कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने हा प्रकल्प मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
हा पायाभूत प्रकल्प ‘पीएमजीएस एनएमपी’च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, यामुळे विविध ठिकाणांदरम्यान जोडणी सुधारेल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि स्थानिक आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी केंद्र सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे आभार! अशी सोशल मिडिया पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
