
Ajit Pawar Angry On Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्थानकातील पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांचा पोलिसांशी गैरवर्तन केल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यासंदर्भात त्यांचे चुलते अजित पवार यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये रोहित पवार यांच्या वागण्यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमोरच त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.
त्याला धाक राहिला आहे की नाही हे…
पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवारांना रोहित पवारांवर गुन्हा दाखल झाला आहे, असं सांगताना यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. आपल्या पुतण्यावर गुन्हा दाखल झाल्याचं समजल्यानंतर अजित पवारांनी संतापून, “त्याला धाक राहिला आहे की नाही हे त्याला विचारतो, मला याविषयी काही माहित नाही,” असं म्हटलं. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेचं, कायद्याचं भान ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली शिकवण आपण कृतीत उतरवली पाहिजे,” अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली.
स्वतःला फार शहाणे समजायला…
“काही लोकप्रतिनिधी चुकीचं वागले तर सगळ्यांनाच नाव ठेवली जातात. स्वतःला फार शहाणे समजायला लागलेत, कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही, असं सर्वसामान्य जनता आणि पत्रकार मित्र देखील बोलतात. त्यामुळे हे माझ्यासहित कुणीही करता कामा नये,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. आमदार गोपीचंद पडाळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये मागील आठवड्यात विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या हाणारीनंतर त्याच दिवशी मध्यरात्रीच्या नाट्यानंतर कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. यानंतर आव्हाडांबरोबर रोहित पवारांनी थेट आझाद मैदान पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिथं पोलिसांशी त्यांचा वाद झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असून, रोहित पवार यांनी संतप्त स्वरात थेट पोलिसांनाच दमदाटी केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यादरम्यान त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचं दिसून आलं.
गुरुवारी विधीमंडळाच्या लॉबीमध्ये दोन गटांमध्ये राडा झाल्यानंतर काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याचदरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘हातवारे करायचे नाहीत सांगतोय तुम्हाला. शहाणपणा करु नका, बोलता येत नसेल तर बोलायचं नाही….’ असं रोहित पवार पोलिसांवर संतापून म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
या प्रकरणावर रोहित पवार काय म्हणाले?
सदर प्रकरणी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी घडल्या प्रकाराची माहिती देताना, “आम्ही आझाद मैदान पोलीस स्थानकात गेलो होतो. तिथं जे एपीआय होते त्यांना नेमकं काय चाललंय कळत नव्हतं. ते झोपेत होते की वेगळं काही हे मला सांगता नाही येणार. नितीन देशमुख कुठे आहेत हे आम्ही विचारलं, तर काय, कुठं… माहिती नाही म्हणाले,” असं सांगितलं.
“आपल्याला सीपींनी देशमुख कुठं असल्याचं सांगितलं आणि आम्ही तिथं गेलो. तिथं एपीआयकडून हातवारे करत ऐकाsss असं काहीतरी वक्तव्य करण्यात आलं,” असं रोहित पवार यांनी सांगितलं. यावरूनच त्यांचा संताप झाला. “जर लोकप्रतिनिधींशी पोलीस असं वागणार असतील तर गरीब जनतेला ताटकळतच ठेवत असतील,” असं ते म्हणाले. “आमदार असताना तुम्ही आमदाराशी नीट बोलत नाही उद्या गरीबाला कशी वागणूक देतील हे?” असा प्रश्न उपस्थित करत, “तुमचं वागणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं,” असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी केलं. “रात्री दोन वाजता अॅडिशनल सीपींना कोणाचा फोन येतो?” असं म्हणत पोलिसांकडून मिळालेली वागणूक पाहता रोहित पवार यांनी तीव्र स्वरात नाराजी व्यक्त केली.