
Mumbai Local Train Bomb Blast 2006 Case: मुंबई उच्च न्यायालयाने 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या 13 पैकी 12 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी आपण वकिलांशी चर्चा केली असून, निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गंधार फाऊंडेशनच्या मोफत डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
“आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे. याचं कारण खालच्या कोर्टाने निर्णय दिला होता. 2006 साली बॉम्बस्फोट झाल्यानंतर एटीएसने आरोपी पकडले होते. पुरावे कोर्टसमोर सादर केले होते. अशातच हा धक्कादायक निर्णय आहे. मी निर्णय पाहिलेला नाही. मात्र वकिलांशी चर्चा केली आणि आपण सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं पाहिजे असं सांगितलं आहे. आम्ही लवकरच सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
“एका निर्णयाने देशात चुकीचा संदेश जाण्याचं कारण नाही. शेवटी भारतात योग्य आणि निष्पक्ष खटला चालतो. मोठ्या लोकांना म्हणजे ते मोठे नाहीत नालायक आहेत. देशात मोठी दहशतवादी घडल्यानंतर त्यांना फाशीची शिक्षाही झाली आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नेमकं घडलेलं काय?
11 जुलै 2006 रोजी संध्याकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी मुंबईतील उपनगरीय ट्रेनमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला. पहिल्याच स्फोटाने मुंबईकरांना सुन्न झाले. त्यानंतर 11 मिनिटांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले आणि त्यामध्ये 209 जणांचे बळी गेले. तसेच 824 जण जखमी झाले. पश्चिम रेल्वेच्या माहिम ते बोरिवली स्थानकांदरम्यान हे बॉम्बस्फोट झाले. प्राथमिक तपासात हे बॉम्ब पहिल्या दर्जाच्या डब्यांमध्ये ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यामध्ये आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता. तसेच हे बॉम्ब गोवंडीत तयार करण्यात आले असून यादरम्यान पाकिस्तानातून आलेल्या काही लोकांनीही त्यात मदत केल्याची माहिती समोर आली होती.
बॉम्बस्फोटांनंतर 10 दिवसांच्या आतच दहशतवादविरोधी पथक दहशतवाद्यांपर्यंत पोहोचले होते. 20 जुलै ते 3 ऑक्टोबर 2006 दरम्यान एटीएसने अनेक दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. यानंतर अनेक धक्कादायक माहिती समोर आली होती. पाकिस्तानची संस्था आयएसआयने दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या मदतीने हे बॉम्बस्फोट घडवल्याचे समोर आले होते. तसेच अटक करण्यात आलेल्या आरोपींचा संबंध सिमीशी असल्याची माहितीही मिळाली होती. 2008 मध्ये या घटनेतीच्या पार्श्वभूमीवर सादिक शेख, आरिफ शेख आणि मोहम्मद शेख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीनचे नावही समोर आले होते. पोलिसांच्या तपासात इंडियन मुजाहिद्दीनचा प्रमुख रियाज भटकळने हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची कबुली तिघांनी दिली होती. त्यानंतर भटकळलाही अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात जून 2007 साली या खटल्याची सुनावणी सुरू झाली आणि 19 ऑगस्ट 2014 रोजी पूर्ण झाली.