
Devendra Fadnavis on Prafull Lodha: बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणी संशयित प्रफुल्ल लोढाला अटक केल्यानंतर आता त्याच्या फोटोंमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. प्रफुल्ल लोढाच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांना पेढा भरवतानाचा त्याचा एक फोटो समोर आला असून, यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या फोटोची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही केली आहे. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोटो असल्याचंही सांगितलं आहे. त्यांच्या आरोपांना आता फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
“हा लोढा याचे सगळ्यांसोबत फोटो आहेत. शरद पवारांसोबतही आहेत. आताच्या परिस्थितीत कोणतेही पुरावे द्यायचे नाही आणि हवेत बोलत राहायचं असं सुरु आहे. त्यांच्याकडे पुरावे मागा. दिवसभर बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करत राहायची. या वायफळ चर्चेला उत्तर द्यायला वेळ नाही. मी विरोधी पक्षनेता होतो पुराव्याशिवाय एकही आरोप केला नाही. तेव्हा केलेला एकही आरोप मागे घ्यावा लागला नाही. एकही पुरावा खोटा ठरला नाही. याला विरोधी पक्षनेता म्हणतात,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
जामनेर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेल्या 62 वर्षीय प्रफुल्ल लोढाने मुंबईतील चकाला परिसरात असलेल्या बंगल्यात 16 वर्षीय मुलीवर तिच्या मैत्रिणीसोबत अत्याचार केल्याचा आणि तिचे अश्लील छायाचित्र काढून ती समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा तसेच तिला बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबईत साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आली आहे. लोढा याच्याविरोधात पॉस्को, बलात्कार, खंडणीसह हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
‘वाढदिवशी पोस्टर लावू नका’
देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने होर्डिग आणि बॅनर लावू नका असं आवाहन केलं आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीत पैसे द्या. त्या निधीतून गरीब, गरजू आणि विशेषत: उपचारासाठी लोकांना मदत करत आहोत. होर्डिंग, बॅनर मला आवडत नाही. तसं करुन मला खूष करु शकणार नाही. तुम्ही मला निधी दिला तर जास्त आनंद होईल,’ असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या व्हायरल व्हिडीओवर ते म्हणाले की, “अतिशय चुकीचं आहे. विधानभवनात चर्चा सुरू असते तेव्हा आपलं कामकाज नसतानाही गांभीर्याने बसणं गरजेचं आहे. रमी खेळतानाचा व्हिडीओ याग्य नाही. त्यांनी खुलासा केला आहे की, मी रमी खेळत नव्हतो अचानक पॉप अप झालं. पण तरी सांगितलं असलं तरी हे आमच्यासाठी भुषणावह नाही”.