Devendra Fadanvis: ‘एकतरी मुलगा असावा असा अप्रत्यक्ष सामाजिक दबाव अनेकांवर असतो. पण मी एका मुलीवरच खुश. आजच्या काळात मुलांपेक्षा मुलीच आई-वडिलांची जास्त काळजी घेतात,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यस्तरीय बेटी बटाओ, बेटी पढाओ कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेदेखील उपस्थित होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मुलगी दिवीजाच्या राजकीय कारकिर्दीबद्दलही सांगितले आहे.
‘दिवीजा बोलण्यात हुशार आहे. पॉलिटिकली करेक्ट बोलते. मात्र मी माझ्या मुलीकडे राजकीय वारसदार म्हणून कधीही पाहणार नाही. दिवीजाला कायद्याचे शिक्षण घ्यायचं आहे, असं सांगतानाच मी माझ्या घराण्यातला शेवटचा राजकारणी ठरेल,’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘महिलेला सन्मानाची, समानतेची वागणूक द्यायला लहानपणापासूनच शिकवलं गेलं पाहिजे. तसे संस्कारच घराघरातून व्हावे. महिलाविरोधातील गुन्हेगारी कायद्यानं प्रतिबंधीत करुच. मात्र समाजातून घरातूनच त्याकरता प्रयत्न व्हायला हवेत,’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘ अजुनही राजकारणात पुरुषांचाच सहभाग जास्त महिलांच्या राजकिय सहभागाबाबत आमच्या बोलण्यात आणि करण्यात तफावत,’ असल्याची कबुली फडणवीसांनी दिली आहे. ‘महाराष्ट्रातील राजकारणातला महिलांचा सहभाग वाढत असला तरी अजुनही अनेक ठिकाणी गावपातळीवरील राजकारणात पुरुषांकडून ‘मी सरपंचपती’ अशी ओळख मला करुन दिली जाते. मी राजकारणात आलो त्यावेळी पदावर असलेल्या महिलांचे ८० टक्के नवरेच त्यांचं कामकाज पाहायचे. १९९७ पर्यंत हा टक्का ५०टक्के पर्यंत खाली आला. २००२ पर्यंत ब-यापैकी महिलाच स्वत:चं राजकीय कामकाज स्वत: करु लागल्या. मात्र; २०२९ मध्ये परिस्थिती बदललेली दिसेल. राजकारणात एक तृतीयांश महिला असतील. राज्याच्या महत्वाच्या अधिकारी पदांवर महिला आहेत. अनेकदा त्या पुरुष अधिका-यांपेक्षाही चांगले काम करतात,’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओपासून याची सुरुवात होऊन आज लखपती दिदींपर्यंत पोहोचलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की एक अतिशय चांगला उपक्रम आपण राबवला. आपल्या समाजात स्त्री भ्रूण नष्ट करायची प्रथा सुरू झाली होती. काही जिल्ह्यांत आजही लिंग विषमता आजही आहे. पण बेटी बचाओ, बेटी पढाओ या उपक्रमामुळे हे जिल्हे सुधारत आहेत. काही जिल्ह्यांत, तालुक्यात मुलांना लग्नाकरता मुली मिळत नाहीत. पण महाराष्ट्रात बेटी बचाओ, बेटी पढाओ २०१५ सुरू झाल्यावर अशाप्रकराच्या जिल्ह्यांत प्रचंड सुधारणा झाली. लिंग गुणोत्तर सुधारलं,’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
