
Devendra Fadnavis on Aurangzeb: इतिहासाच्या पुस्तकातील उल्लेखामुळे क्रूर मुघल शासक औरंगजेब पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रात औरंगजेबची कबर आहे. औरंगजेबच्या कबरीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य तेले आहे. औरंगजेब हा भारताचा नायक नाही. भारतातील कोणत्याही समाज त्याला नायक मानत नाही. त्यामुळे त्याच्या कबरीवर हार फुले अर्पण करण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच औरंगजेबची कबर हटवण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे.
औरंगजेबची कबरीवर हार फुले अर्पण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी पुरातत्वीय पैलूचा उल्लेख केला. सर्वप्रथम, औरंगजेब हा भारताचा नायक नाही. तो भारतातील कोणत्याही समाजाचा नायक नाही. त्यामुळे त्याला फुले आणि हार अर्पण करण्यात काही अर्थ नाही. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी नेहमी केली जाते. मात्र, ही कबर हटवणे शक्य नाही. देशाच्या संसदेने मंजूर केलेल्या कायद्यानुसार ही कबर संरक्षित असल्याचे मानले जाते.
औरंगजेबची कबर केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे राज्य सरकार या संदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. फक्त केंद्रच निर्णय घेऊ शकते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. इतिहासाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि चुकीच्या गोष्टींचे गौरव करू नये असे मुख्यमंत्री म्हणाले.
आरक्षणाशी संबंधित एका प्रश्नावर देखील मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. 2024 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता ज्यामध्ये म्हटले होते की अनुसूचित जातींचे आरक्षण फक्त हिंदू, बौद्ध आणि शीख समुदायांनाच दिले जाऊ शकते. जर कोणी धर्मांतर केले तर त्याला हे आरक्षण देता येणार नाही. धर्मांतरानंतर त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा संपतो. त्यामुळे, राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदेश देईल.
दरम्यान, इतिहासाच्या पुस्तकात आता मुघलांच्या क्रूरतेचे धडे दिले जाणार आहेत. NCERTकडून आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात मोठे बदल करण्यात आलेत. बाबर निर्दयी शासक, अकबर क्रूर पण सहिष्णू असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला. तर, औरंगजेब कट्टर धार्मिक आणि मंदिरं पाडणारा शासक असं वर्णन या पुस्तकात करण्यात आला. दिल्ली सुल्तानशाही आणि मुघल काळाची विद्यार्थ्यांना ओळख करून देणाऱ्या या पुस्तकात, त्या काळात ‘धार्मिक असहिष्णुतेच्या अनेक घटना’ घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. हे पुस्तक 2025-26 शैक्षणिक सत्रापासून शाळांमध्ये लागू केले जाईल.