
पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजे शिर्के घराण्याच्या वंशजांनी ‘छावा’ चित्रपटाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिर्के घराण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना दोषी ठरवल्याचा आरोप त्यांनी केला.
.
दीपकराजे शिर्के यांनी सांगितले की, दिवंगत लेखक शिवाजी सावंत यांच्या काल्पनिक कादंबरीवर आधारित या चित्रपटात त्यांच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली आहे. स्वराज्यात राजे शिर्के यांचे मोठे योगदान असून, मागील १३ पिढ्यांपासून छत्रपती घराण्याशी त्यांचे संबंध सौहार्दपूर्ण आहेत.
शिर्के वंशजांनी माहिती अधिकारात शासनाकडे विचारणा केली असता, त्यांच्या घराण्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी चुकीचा संदर्भ दिल्याबद्दल स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
चित्रपट उत्कृष्ट असला तरी त्यातील खलनायकाचे चित्रण चुकीचे असल्याचे शिर्के वंशजांचे म्हणणे आहे. चुकीच्या इतिहासामुळे समाजात दूषित वातावरण निर्माण होते, म्हणून इतिहासावर योग्य संशोधन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणी चित्रपट निर्माते आणि कादंबरी प्रकाशक यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.