
Eknath Shinde on Amit Salunkhe: झारखंडमधील मद्य घोटाळ्यात सुमित फॅसिलिटीचा संचालक अमित साळुंखे याला अटक करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापलं आहे. मुंबई पुण्यासह एमएमआर क्षेत्रातील प्रमुख महापालिकांमध्ये यांत्रिक सफाई तसंच रुग्णवाहिकांचा पुरवठा करण्याची शेकडो कोटी रुपयांची कंत्राटं मिळवून अमित साळुंखे प्रकाशझोतात आला आहे. पुण्यातून त्याला अटक केल्यानंतर आता विरोधकांकडून टीकेचा भडीमार सुरु आहे. तसंच हजारो कोटींची निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संजय राऊतांनी अमित साळुंखेचा संबंध श्रीकांत शिंदेंच्या संस्येशी असल्याचा आरोप केला आहे.
अमित साळुंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ज्याचं तोंड मिठीतील गाळात गेलं आहे, जे गाळात रुतले आहेत, खड्ड्यात पैसे खाणारे लोक आहेत, कोविडच्या खिचडीत चोरी करणारे, लोकांच्या तोंडातील घास मिळवणारे त्यांनी आम्हाला काय शिकवावं. झारखंडमधील जो काही गुन्हा, घोटाळा आहे त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी करेल. त्यामुळे ज्यांचं घऱ काचेचं असतं ते दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये. आम्ही स्वच्छ आहोत, आणि यांना मुंबईतील जनतेनं पाहिलं आहे. 25 वर्षं यांनी मुंबईला लुटलं आहे. ते आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैवी आहे”.
संजय राऊतांनी काय आरोप केला आहे?
“झारखंडमधून एक टोळी आली. अमित साळुंखे यांना अटक केली. सुमित फॅसिलिटी काय आहे? जरा चौकशी करा. 800 कोटींचा घोटाळा महाराष्ट्रमध्ये झाला. 108 नंबर ॲम्ब्युलन्ससंदर्भात आहे. 650 कोटींनी टेंडर वाढवले. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचे आहेत. हे सगळे पैसे श्रीकांत शिंदे फाउंडेशनकडे वळवले,” असा आरोप राऊत यांनी केला आहे.
रुग्णवाहिका घोटाळ्यावरुन गदारोळ का?
संजय राऊतांनी सांगितलं आहे की, “100 कोटींच्या रुग्णवाहिका निविदा 800 कोटींपर्यंत गेली. त्या 108 नंबर रुग्णवाहिकेचे कंत्राट सुमित फॅसिलिटीला देण्यात आले होते. त्याचा सूत्रधार अमित साळुंखे आहे. हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. अमित साळुंखे श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा आर्थिक कणा आहे. मोठ्या प्रमाणात पैसे शिंदेंकडे वळवण्यात आले”.
पुढे त्यांनी म्हटलं की, “अमित साळुंखे हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटले आहेत, कोणाच्या खात्यात गेले आहेत हे शोधायचं आहे. हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत जोडले जात आहेत”.
काय आहे मद्यविक्री घोटाळा?
झारखंडमध्ये सध्या मद्य विक्री घोटाळा गाजत आहे. उत्पादन शुल्क विभागात झालेल्या या घोटाळ्याने झारखंड सरकारला मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आहे.
झारखंड सरकारने छत्तीसगडमधील सरकारी दारु दुकानांच्या व्यवस्थापनाचं मॉडेल झारखंडमध्ये लागू केलं होतं. यात खासगी प्लेसमेंट एजन्सीमार्फत कामगार पुरवले जात होते. हे कंत्राट सिंघानियाला मिळाले. यात त्याने 450 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. अमित साळुंखेचा सहभाग असल्याने त्यालाही अटक करण्यात आली.
झारखंड दारू घोटाळ्यात आतापर्यंत आयएएस अधिकारी विनय कुमार चौबे यांच्यासह 11 आरोपींना अटक केली आहे. मे 2022 मध्ये छत्तीसगड मॉडेल धर्तीवर दारू विक्री सुरू झाली होती. त्यातूनच हा दारू घोटाळा उघड झाला. त्यात सुमित फॅसिलिटीचे अमित साळुंखेला अटक करण्यात आली आहे.