
Dharashiv Crime News: पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. पतीनेच पत्नीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. इतकंच नव्हे तर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पत्नीला ब्लॅकमेल केलं असल्याचं समोर आलं आहे. धाराशिव तालुक्यातील येडशी गावात ही घटना घडली असून पतीविरोधात धाराशिव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित पत्नी संगीता शिंदे यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती उत्तम शिंगे हा सतत पैशांसाठी त्रास देत होता. लग्न झाल्यानंतरच पत्नी आणि तिच्या माहेरच्यांकडे पैशांची मागणी करणाऱ्या उत्तमने आता थेट पत्नीचे अश्लील फोटो काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. इतकेच नव्हे तर, त्या अश्लील फोटोसह अनेक नातलगांनाही फोटो पाठवत, पैशांची मागणी करण्यात आली. या त्रासाला कंटाळून पत्नी संगीता शिंदे यांनी थेट धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली
धाराशिव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी उत्तम शिंदेविरोधात गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप त्याला अटक झालेली नाही. एकीकडे महिला सुरक्षेचे दावे केले जात असताना, पतीकडून होणारा मानसिक छळ आणि ब्लॅकमेलिंग हा चिंतेचा विषय बनला आहे.
सावत्र बापाचा विद्यार्थिनीवर बलात्कार
शहरातील विद्यादीप बालगृहातील आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. सावत्र बापाने मुलीवर अत्याचार केल्याने ती बालगृहात दाखल होती. त्या वेळी तिचा काका (आरोपीचा भाऊ) बालगृहातील सिस्टरच्या मदतीने पीडितेला भेटायचा. त्याने मुलीला धमकावून कोर्टात बलात्कार झालाच नसल्याची खोटी साक्ष द्यायला भाग पाडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर 2023 पासून विद्यादीप’मध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने दिलेल्या जबाबानुसार, तिच्यावर सावत्र पित्याने अत्याचार केला. त्यामुळे आरोपी अशफाक शेख हा हसूल कारागृहात शिक्षा भोगतोय. त्याचा भाऊ महेमूद गफार शेख हा मुलीचा सख्खा काका असल्याचे भासवून कमल सिस्टरच्या मदतीने बालगृहात येऊन पीडितेला तक्रार मागे घे असा दबाव टाकायचा. कोर्टातील सुनावणीवेळी कमल सिस्टर पीडितेला घेऊन गेल्या. त्या ठिकाणी वडिलांनी अत्याचार केला नसल्याचा जबाब महेमूद व कमल सिस्टरच्या मदतीने लिहून घेत कोर्टात सादर केल्याचं सांगण्यात येताय.