
EPFO Rules: केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेतील कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) च्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे संगठित क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपले EPFO खाते सक्रिय ठेवणे आणि त्याची माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. या नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
आता कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा विमा मिळेल. मग कर्मचाऱ्याच्या PF खात्यात पैसे असो वा नसो. नोकरीत 60 दिवसांचा खंड पडला तरीही सातत्य मानले जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
नवीन नियम काय सांगतात?
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने EDLI योजनेत बदल करताना महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी EDLI योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याच्या PF खात्यात किमान 50,000 रुपये असणे आवश्यक होते. आता हा नियम शिथिल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याच्या खात्यात पैसे नसले तरी त्याच्या कुटुंबाला 50,000 रुपये विम्याची रक्कम मिळेल. तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याने सलग 12 महिने नोकरी केली असेल, तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. नव्या नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी एक नोकरी सोडून दुसऱ्या नोकरीला लागला आणि दोन नोकऱ्यांमधील अंतर 60 दिवसांपेक्षा कमी असेल, तर त्याला सातत्यपूर्ण सेवेचा लाभ मिळेल. याचा अर्थ, दोन नोकऱ्यांमधील कमी कालावधीचा खंड असला तरीही कर्मचारी EDLI योजनेच्या विम्याच्या लाभासाठी पात्र ठरेल.
जर कर्मचाऱ्याचा मृत्यू त्याच्या शेवटच्या पगारातून PF कपात झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आत झाला, तर त्याच्या कुटुंबाला विम्याचा लाभ मिळेल. ज्यांनी नोकरी सोडल्यानंतर काही काळातच मृत्यू झाला, त्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल महत्त्वाचा आहे.
EDLI योजना म्हणजे काय?
कर्मचारी जमा लिंक्ड विमा योजना (EDLI) ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) अंतर्गत चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश संगठित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्या कायदेशीर वारसांना एकरकमी आर्थिक मदत दिली जाते. विशेष बाब म्हणजे, या योजनेसाठी कर्मचाऱ्याला स्वतःच्या खिशातून कोणतेही योगदान द्यावे लागत नाही. विम्याचा हप्ता पूर्णपणे नियोक्त्याकडून भरला जातो.
कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कसा होईल फायदा?
या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांच्या PF खात्यात जास्त शिल्लक नसते, त्यांना या योजनेचा लाभ मिळणे सोपे झाले आहे. तसेच, नोकरीत खंड पडल्यास किंवा नोकरी बदलल्यानंतरही विम्याचा लाभ मिळेल, यामुळे कर्मचाऱ्यांना लवचिकता मिळेल. याशिवाय, शेवटच्या पगारानंतर 6 महिन्यांपर्यंत विम्याचा लाभ मिळण्याची तरतूद ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.