
Konkan Railway: गणेशोत्सवासाठी गावी जायचंय, पण रेल्वेचे तिकीट मिळत नाहीत. तिकीट जरी मिळाले तरी स्टेशनपासून गावापर्यंत जाण्यासाठी पुढचा प्रवास करणे कधीकधी अधिक किचकट ठरते. अशावेळी स्वतःच्या कारने आलो असतो तर, असा प्रश्न चाकरमान्यांना पडतो. पण मुंबई-गोवा महामार्गाचा रस्ता आणि वाहतुक कोंडी यामुळं पोहोचायलाच खूप वेळ लागतो. पण लवकरच प्रवाशांचा प्रवास सुकर आणि आरामदायी होणार आहे.. कोकण रेल्वेने एक खास योजना आणली आहे.
आता तुम्ही स्वतःच्या कारने रेल्वेने कोकणात जावू शकता, ऐकायला थोडं विचित्र वाटते ना, पण हे खरंय. ही सेवा 23ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवासाठी नागरिकांना या सेवेचा वापर करता येणार आहे. यामुळं प्रवास तप सुलभ होणारच आहे पण प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे.
कोकण रेल्वेकडून मुंबई ते गोव्या दरम्यान ही नवीन सेवा सुरू करत आहेत. तुमच्या मालकीची कार तुम्ही रेल्वेने कोकणातील गावी घेऊन जाता येणार आहे. महाराष्ट्रातील कोलाड ते गोव्यातील वेर्णापर्यंत ही सेवा सुरू असेल. तसंच, यामुळं 20-22 तासांचा प्रवास रस्ते मार्गाचा प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण होणार आहे.
एका ट्रेनमध्ये साधारण 40 कार घेऊन जाता येतील. तर, याचे शुल्क 7,875 प्रति कार इतके असेल. या गाड्या बेल्टने बांधल्या जातील. सुरक्षिततेसाठी हँडब्रेक लावले असतील याची खातरजमादेखील केली जाईल. मात्र प्रवासादरम्यान कोणालाही कारमध्ये बसण्याची परवानगी नसणार. तर, प्रवाशांना त्यासोबतच असलेल्या प्रवासी कोचमधून प्रवास करता येणार आहे. प्रत्येक गाडीत जास्तीत जास्त तीन लोकांना परवानगी आहे. 3AC मध्ये दोन आणि SLR मध्ये एका व्यक्तीला बसता येईल. 3AC चे भाडे 935 रुपये आहे. तर सेकंड क्लासचे भाडे 190 रुपये आहे.”
ट्रेन कोलाडवरुन संध्याकाळी मार्गस्थ होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वेर्णा येथे पोहोचणार आहे. प्रवाशांना ट्रेन निघण्यापूर्वी साधारण 2-3 तास आधी पोहोचणे गरजेचे आहे. ट्रेनमध्ये खास 20 डबे असतील. तर, प्रत्येक वॅगनमध्ये दोन गाड्या ठेवता येतील. ही सेवा सुरू होण्यासाठी किमान 16 गाड्यांची बुकिंग आवश्यक आहे.
गणेशोत्सवासाठी ही सर्वात मोठी भेट चाकरमान्यांसाठी असणर आहे. नागरिकांचा प्रवास सुकर व आरामदायी होणार आहे.