
Raj Thackerays Prediction Ladki Bhahin: लाडकी बहिण योजना सुरू झाल्यापासूनच योजना बंद होण्याची प्रचंड चर्चा सुरूये.आता गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हेच भाकीत केलंय.लाडकी बहिण योजनेमुळे सरकारवर प्रचंड आर्थिक ताण येतोय, त्यामुळे योजना फार काळ तग धरणार नाही, असं राज ठाकरेंचं म्हणण आहे. मात्र सत्ताधा-यांनी राज यांचं भाकीत खोडून काढलंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. आता एप्रिल महिन्याच्या हप्ता कधी मिळणार? याबाबत महिलांना उत्सुकता लागली आहे. अशातच लाडकी बहीण योजना बंद होणार, असे भाकित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय.लाडक्या बहिणांना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63 हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.
राज ठाकरेंच्या या भाकितावर सत्ताधा-यांनी टीका केलीये.योजनेमुळे सरकारवर ताण येतोय, हे खरंय पण लाडक्या बहिणींना आम्ही वा-यावर सोडणार नाही.उत्पन्न वाढण्यावर आमचा भर आहे असं शंभुराज देसाई, प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.’लाडक्या बहिणींना वा-यावर सोडणार नाही. 2 वर्षांत आर्थिक स्थिती भक्कम होईल, असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येतंय.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जुलै 2024मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रूपये दिले जातात.सुरुवातीला अर्ज केलेल्या सगळ्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला. सरकारने नंतर अर्जांची छाननी सुरू केली, उत्पन्न अधिक असलेल्या, गाडी असणा-या महिलांना वगळलं. सत्तेत आल्यानंतर 2100 रूपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र सरकारकडून अजूनही महिलांना 2100 रूपये दिले जात नाहीत. दरम्यान लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी व्यक्त केलाय.
लाडकी बहिण योजना, कर्जमाफी आणि इतर योजनांच्या घोषणांमुळे महायुती सरकार सत्तेत आलं.मात्र सत्तेत आल्यानंतर या योजना सुरू ठेवणं, सरकारला आता जड जातंय…महिलांना एकीकडे 2100 रुपयांची आस आहे, मात्र 1500 देणंच सरकारला मुश्किल झालंय.आता राज ठाकरेंनी योजना बंद होईल असं म्हंटलय. त्यांचं हे भाकीत आता कितपत खरं होईल हे येणाऱ्या काळातच कळेल.