
Maharashtra Governor On Marathi vs Hindi: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आता हिंदी-मराठी वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावरुन झालेल्या गैरवर्तनाच्या घटनांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यपालांनी तामिळनाडूमधील घटनेचाही उल्लेख केला. मुंबईतील राजभवन येथील एका कार्यक्रमादरम्यान राज्यपाल बोलत होते. यावेळी त्यांनी, “आजकाल मी वर्तमानपत्रांमध्ये पाहतो की लोक म्हणत आहेत – जर तुम्ही मराठी बोलला नाही तर तुम्हाला मारहाण होईल. तमिळनाडूमध्येही असेच घडले आहे,” असं म्हणत विषयाला हात घातला.
तामिळनाडूमधील ती घटना सांगितली
पुढे बोलताना राज्यपालांनी, “मी खासदार असताना खूप काम करायचो. एकदा मी महामार्गावर होतो तेव्हा दोन गटांमध्ये भांडण झाले. मी माझ्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली आणि प्रकरण काय आहे ते पाहण्यासाठी मी खाली उतरलो. मला पाहून काही लोक पळून गेले. मग मी मारहाण करणाऱ्या गटाला विचारले की काय समस्या आहे. ते माझ्याशी हिंदीत बोलू लागले. मला हिंदी नीट येत नाही, म्हणून मी जवळच्या एका हॉटेल मालकाला विचारले की हे लोक काय बोलत आहेत. हॉटेल मालकाने सांगितले की त्यांना मारहाण केली जात आहे कारण ते हिंदीत बोलत होते आणि दुसरा गट त्यांना तमिळ बोलण्याचा आग्रह करत होता,’ असं म्हणत जुना प्रसंग सांगितला.
…तर मी लगेच मराठी बोलू लागेन का?
हा संदर्भ देत राज्यपाल पुढे, “आजही परिस्थिती तशीच आहे. जर तुम्ही मला मारहाण केली तर मी लगेच मराठी बोलू लागेन का? मी मारहाण केलेल्या गटाची माफी मागितली, त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि ते बरे होईपर्यंत जागा सोडली नाही,’ असंही म्हणाले.
गुंतवणुकदार पाठ फिरवतील असा इशारा
राज्यपालांनी अशाप्रकारे भाषिक द्वेष केल्यास गुंतवणूकदार राज्याकडे पाठ फिरवतील अशी भीतीही व्यक्त केली. “जर आपण द्वेष पसरवला तर कोणता गुंतवणूकदार आपल्या राज्यात येईल? या साऱ्यामधून आपण दीर्घकाळालीन विचार केल्यास फक्त महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत. आपण हे असले प्रकार क्षुल्लक राजकीय फायद्यासाठी करू नयेत,” असंही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले.
सर्वाधिक गरीब हे हिंदी भाषिक
“आपण शक्य तितक्या भाषा शिकल्या पाहिजेत,” अशी अपेक्षाही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले. “दारिद्र्यरेषेखाली राहणारे लोक 30 टक्के ते 5-7 टक्क्यापर्यंत आहेत आणि त्यापैकी बहुतेक हिंदी भाषिक आहेत. जर आपल्याला गरिबांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला त्यांची भाषा देखील समजून घ्यावी लागेल,” असंही राज्यपाल म्हणाले.
मातृषाभेचा अभिमान बाळगा पण…
“आपण शक्य तितक्या भाषा शिकल्या पाहिजेत, आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे यात कोणतीही तडजोड नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण दुसऱ्याच्या मातृभाषेचा द्वेष करावा. आपण एकमेकांशी सहिष्णु असले पाहिजे,” असंही राज्यपालांनी म्हटलं.