
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. रविवारपासूनच मुंबई आणि परिसरात रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई शहरावर पावसाळी ढगांचं अच्छादन असल्यानं सूर्यकिरणांना नागरिक मुकले असून, पुढील काही दिवस हेच चित्र पाहायला मिळणार आहे.
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही पावसानं कमबॅक केलं आहे ज्यामुळं पुढील 24 तासांमध्ये मान्सूनचा प्रभाव कायम असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह पासवाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 21 जुलै 2025 रोजी आकाश अंशत: ढगाळ राहील. तर हलक्या ते मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींसह तापमान 25-32 अंश सेल्सियस दरम्यान राहील असा अंदाज आहे. दरम्यान उच्च आर्द्रतेमुळे उकाडा जाणवणार असून, पावसानं तापमानात मात्र फारसा फरक पडणार नाही.
शहरावर असणारं पावसाचं सावट पाहता नागरिकांनी पाणी साचण्याचा धोका आणि वाहतुकीवरील परिणाम टाळण्यासाठी सावधगिरी बाळगावी असाही इशारा देण्यात आला आहे.
सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढणार
विशेषत: सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून, कोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. तसंच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर
धाराशिव, संपूर्ण विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागील आठवडाभर राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, आता राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.