Weather News Winter Temprature updates : केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि प्रामुख्यानं काश्मीरच्या खोऱ्यासह उत्तराखंडच्या पर्वतीय भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. हिमाचलच्या मैदानी क्षेत्रांमध्ये आकाश निरभ्र असलं तरीही लाहौल स्पितीसारख्या दुर्गम भागांमध्ये मात्र पारा उणे 2 अंशांपर्यंत खाली येणार आहे. उत्तर भारताकडील अतीव उत्तरेस असणाऱ्या या प्रांतांमध्ये वाढणारा थंडीचा कडाका आणि पश्चिमी झंझावाताच्या परिणामांमुळं महाराष्ट्रसुद्धा गारठताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यात सर्वत्र दिवस मावळतीला गेल्यानंतर रात्रीसह पहाटेच्या तापमानात झपाट्याने घट होण्यास सुरुवात झाली असून ते सरासरीपेक्षा खाली आल्याचं स्पष्ट होत आहे. ज्यामुळं चार ते पाच दिवस राज्यभरात थंडीचा कडाका वाढणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. ज्यामुळं हिमाचल आणि काश्मीरचा गारठा विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही अनुभवण्यास मिळत असून, कोकण पट्टासुद्धा इथं अपवाद ठरत नाहीय. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा रात्रीच्या तापमानात घट नोंदण्यात येत असून, आता खऱ्या अर्थानं राज्यात तापमान घसरत असून थंडीचा जोर वाढू लागला आहे. (Maharashtra Weather News)
धीम्या गतीत तापमानात घट
राज्यात प्रामुख्याने नाशिक, निफाड, अहिल्यानगर या भागांमध्ये पारा आणखी खाली आलेला पाहायला मिळतोय. अहिल्यानगर शहरात गुरुवारी पारा 11 अंश सेल्सिअसवर पोहोचला, तर तिथं सातारा, कोल्हापुरातील घाटमाथ्यावरही दाट धुकं आणि थंड वाऱ्यांनी नागरिकांना हैराण केलं. रात्री आणि पहाटेच्या वेळी राज्यात गारठा असला तरीही दुपारच्या वेळी मात्र तीव्र सूर्यकिरणं नागरिकांना घाम फोडच आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं धीम्या गतीत तापमानात घट होत असल्यानं सध्या दोन टोकाच्या स्थिती राज्यात पाहायला मिळत आहेत.
सध्या राजस्थान, चंदीगढ इथंही तापमानात घट होत असून, त्यापुढं पुढं थंडीच्या या लाटेची शक्यता विदर्भात निर्माण होऊ शकते. ज्यामुळं नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत भोपाळ, इंदूर, राजगड, छिदवाडा, मंडला आणि मेहर जिल्ह्यांत थंडीच्या लाटेची शक्यता असून, भोपाळमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सियसच्या घरात असून काही दिवस ही स्थिती कायम असेल हेच स्पष्ट होत आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/B0QqWXn9Lh
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) November 12, 2025
हिमाचलमध्ये हिमवर्षावास पूरक स्थिती…
काश्मीरच्या खोऱ्यात तापमानात मोठी घट होत असतानाच हिमाचलच्या पर्वतीय भागांमध्ये बर्फाच्छादित भागांत वाहणारे वारे जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत. दृश्यमानता कमी असल्या कारणानं येथील वाहतुकीवरही परिणाम होत आहे. सध्या हिमाचलच्या किलाँग, कुकुमसेरी आणि ताबो इथं तापमान अनुक्रमे उणे 2.9 अंश, उणे 2.4 अंश आणि उणे 2.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं असून हिमवर्षावासाठी ही पूरक स्थिती असल्यानं बहुतांश भागांवर बर्फाचं अच्छादन पाहायला मिळत आहे.
FAQ
उत्तर भारतातील कोणत्या भागांत थंडीचा कडाका वाढणार आहे?
केंद्रीय हवामानशास्त्र विभागानुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर (विशेषतः काश्मीर खोरे), आणि उत्तराखंडच्या पर्वतीय भागांत थंडीचा कडाका वाढणार आहे. हिमाचलच्या दुर्गम भागांत जसे लाहौल स्पितीमध्ये तापमान उणे 2 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते.
महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कसा दिसत आहे?
पश्चिमी झंझावाताच्या परिणामांमुळे महाराष्ट्रातही थंडी वाढली आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी तापमान सरासरीपेक्षा खाली येत असून, पुढील 4-5 दिवस राज्यभरात थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
महाराष्ट्रातील कोणत्या भागांत तापमान सर्वाधिक खाली आले आहे?
नाशिक, निफाड आणि अहिल्यानगरमध्ये तापमान आणखी कमी झाले आहे. अहिल्यानगरमध्ये गुरुवारी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर दाट धुके आणि थंड वारे नागरिकांना त्रास देत आहेत.
