
Manikrao Kokate Reaction: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादात अडकतात. यांच्या काही वादग्रस्त कृती आणि वक्तव्यांमुळे ते सातत्याने चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या विधानामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीका झाली होती. आता ते जंगली रमीची जाहिरात पाहण्यावरुन ट्रोल होऊ लागल्यात. पण त्यावेळी नेमकं काय झालं होतं? यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
जाहिरात स्किप करणार होतो पण…
वरच्या हाऊस मधला काम संपल्यानंतर खालच्या हाऊसमध्ये काय चालू आहे करण्यासाठी युट्युब चालू केलं आणि जाहिरात आली. ती जाहिरात स्किप करणार होतो पण दोन-चार सेकंद जास्त वेळ लागला. पुढे दाखवला असता तर पूर्ण व्हिडिओ कळला असता, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. ते वैयक्तिकरित्या फक्त माझ्या कपड्यांवर, मोबाईलवर, गाडीवर बोलत आहेत. मी केलेल्या कामात वर उपाययोजनांवर विरोधी पक्षवाले बोलत नाहीत. माझं काम पारदर्शक आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. हाऊसचे नियम मला माहित आहेत. तिथे कॅमेरे चालू असतात, हे मला माहिती असल्याचे ते म्हणाले.
व्हिडीओ कोणी काढला?
जाहिरात कशी स्किप करायची हे मला माहित नव्हते. कोणी व्हिडीओ काढतय याकडे मी लक्ष दिलं नाही. ज्याने व्हिडीओ काढला असेल त्याला काढू द्या. मात्र खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे ते पाहण्यासाठी मी युट्यूब चालू केलं होतं. जाहिरात आली आणि तेवढ्यात माझा व्हिडिओ काढला गेल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.
प्रत्येकाला जंगली रमीच्या जाहिराती येतात
रोहित पवार यांनी माझ्या संदर्भात विधाने केली. शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? मोठ्या प्रमाणात काम सुरू असून रिकामी उद्योग कसे दिसतात. लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले. कोणीतरी व्हिडिओ डाऊनलोड केला असेल. स्किप करताना ते आल्याचे कोकाटेनी सांगितले. शेतकऱ्यांविरुद्ध वेड वाकड स्टेटमेंट मी केलेलं नाही. प्रत्येकाला जंगली रमीच्या जाहिराती येतात. रोहित पवारांच्या मोबाईलमध्येही जाहिराती येतात. कोणत्या गोष्टीचा भांडवल करावे कोणत्या नाही हे रोहित पवारांना कळायला हवे. ते स्वतःची करमणूक करून घेत असल्याचे कोकाटे म्हणाले.
मंत्र्यांची बदनामी करण्याचे काम
विधानसभेत सुंदर काम झालेलं आहे. विरोधी पक्षाला काहीही करता आलेलो नाही. आपलं सरकार येऊ शकत नाही हे त्यांना कळून चुकलंय. त्यामुळे सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधात गरळ ओकणे, त्यांची बदनामी करणे असा कार्यक्रम त्यांनी आखलाय, असे कोकाटे म्हणाले. शेतकऱ्यांच्या विरोधात मी कुठलंही विधान केलेलं नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार असले, कोणी असले तरी मला त्यात इंटरेस्ट नाही. याला फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.