
Mumbai Crime News: नोकरीचं आमिष दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप 63 वर्षीय समाजसेवकावर करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सध्या तो पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. ही घटना अंधेरी पूर्वमधील हॉटेलमध्ये घडली असून, साकीनाका पोलिसांकडून गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
पीडित तरुणी ही अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून जात आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रफुल्ल लोढा वय 63 समाजसेवक याने तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवत ओळख वाढवली. याच बहाण्याने प्रफुल्ल लोढा याने तिला अंधेरीतील एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. नोकरीच्या शोधात असणारी तरुणी तिथे गेल्यानंतर आरोपीने तिच्या इच्छेविरुद्ध जाऊन जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.
19 वर्षीय तरुणीने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर आपली व्यथा कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तरुणीने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत प्रफुल्ल लोढा याच्याविरोधात तक्रार दाखल केली.
साकीनाका पोलिसांकडून तातडीची कारवाई
7 जुलै रोजी साकीनाका पोलिसांनी प्रफुल लोढा याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र, ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे प्रकरण त्यांच्या ताब्यात देण्यात आले. 17 जुलै रोजी पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले. कोर्टाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सध्या एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्ह्याचा तपास सुरू केला असून आरोपीच्या अन्य गुन्ह्यांची चौकशी, पीडितेचा बयान आणि सीसीटीव्ही पुरावे यावर पोलिसांचे लक्ष केंद्रित आहे. या घटनेमुळे समाजसेवेच्या नावाखाली घाणेरडे उद्योग करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.