
Mumbai Politics Eknath Shinde Vs Raj Thackeray: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती करुन लढणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. शालेय अभ्यासक्रमामध्ये पहिल्या इयत्तेपासून त्रिभाषासुत्री लागू करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या शासन आदेशाविरोधात राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधुंनी आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यासंदर्भात समिती स्थापन करत यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी हा शासन आदेश मागे घेतला. यानंतर 5 जुलै रोजी दोन्ही ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षानंतर एकाच मंचावर एकत्र आले.
शिंदेंकडून राज ठाकरेंना धक्का
मराठीसाठी एकत्र आलो आहोत असं सांगताना पुढेही एकत्र राहू असं सूचक विधान त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी केलं. मात्र त्यानंतर राजकीय युतीवरुन राज ठाकरेंबरोबरच उद्धव ठाकरेंनीही कोणतीही थेट भूमिका अद्याप घेतलेली नसली तर भविष्यात हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर खास करुन मुंबई आणि उपनगरांमधील पालिका निवडणुकींवर परिणाम होईल असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता ठाकरे बंधुंच्या या संभाव्य युतीला तोंड देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कंबर कसली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज ठाकरेंना एक धक्का देणार आहेत.
मोठा पक्षप्रवेश
मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मराठी मतांवर परिणाम होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आले तर सर्वात मोठा फटका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला बसेल अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींदरम्यान मुंबईत एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंना धक्का देण्यास सुरूवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेच्या माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु झाले असून याच मोहिमेचा पहिला भाग म्हणून आज अंधेरीत मोठा पक्षप्रवेश सोहळा होत आहे. मनसेचे पवईतील माजी नगरसेवक अविनाश सावंत हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज दुपारी अंधेरीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
नक्की वाचा >> ‘फडणवीसांना भेटलात का?’ आदित्य ठाकरे म्हणाले, ‘एक व्यक्ती आता…’; शिंदेंचं टेन्शन वाढणार?
शिंदे काय बोलणार?
ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्याही एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी आता राज ठाकरेंच्या माजी नगरसेवकांनाही पक्षात घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेमकं काय बोलणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.