
सागर गायकवाड, झी मीडिया, नाशिक : आपात्कालीन भोंगे वाजले की परिस्थितीचं गांभीर्य अनेकांच्याच लक्षात येतं. मुळात याची खऱ्या अर्थानं प्रचिती आली ती म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) दरम्यान. इथं भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला आणि त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या बाजुनंही गोळीबार झाला. याचदरम्यान भारताच्या सीमाभागातील गावांमध्ये सायरन अर्थात भोंगे वाजले आणि नागरिकांना सतर्क करण्यात आलं. मुळात भोंग्यांचा हा झाला अगदी हल्लीचा संदर्भ. मात्र, भोंग्यांचा वापर सहसा नागरिकांना सतर्क करण्यासाठी किंवा एखाद्या आपात्कालीन परिस्थितीबाबत सजग करण्यासाठी केला जातो हीच महत्त्वाची बाब.
पालिका बसवणार भोंगे… इशारा मिळताच आता भोंगे वाजणार?
दरम्यान, आता पालिका प्रशानांकडूनसुद्धा या भोंग्यांचं महत्त्वं लक्षात घेत ते बसवण्याचा निर्णय घेतला जात असून यात नाशिक महानगरपालिकेनं पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळत आहे. (Nashik News)
नाशिक शहरात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना वेळेवर इशारा देण्यासाठी नाशिक महानगरपालिका भोंगे बसवण्याचं काम हाती घेणार आहे. शहरातील विविध शासकीय इमारती, शाळा, तसेच अग्निशमन केंद्रांवर हे भोंगे बसवले जाणार आहेत. महापालिकेला गृह विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जून 2025 मध्ये पत्र मिळालं होतं. त्यानुसार यासंदर्भात महापालिका आयुक्त / प्रशासक मनीषा खत्री यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले.
खत्री यांनी महापालिकेच्या विविध विभागप्रमुखांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला. संबंधित बांधकाम विभाग, विद्युत विभाग, शिक्षण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना एकत्रित समन्वयाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
नागरिकांना वेळेवर सावध करण्यासाठी पालिका लागली कामाला…
भोंगे बसविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणांची तपासणी करून आवश्यकतेनुसार पर्यायी जागाही निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपत्तीजनक परिस्थितीत – नागरिकांना वेळेवर सावध करण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमामुळे आपत्कालीन स्थितीमध्ये प्रशासनाकडून त्वरित जनजागृती करता येणार असल्याचं सांगितलं जात आहे.