
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. राज्यात सध्या भाषावाद उफाळून आला आहे. मनसेने मराठीवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ललिता कुमारी प्रकरणाच्या निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभरात सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ललिता कुमारी निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी विनंतीदेखील सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.
याचिकेत म्हटलं आहे की, राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात आणि भाषेच्या आधारावर राजकारण करतात, जे संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि कुमारी निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध आहे. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि योग्य अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत.
सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगासह इतर अधिकाऱ्यांना पक्षकार करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांचा निशिकांत दुबेंना इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंना जाहिर आव्हान दिलं आहे. तू मुंबईत आल्यानंतर समुद्रात बुडवून मारेन अशा शब्दांत राज ठाकरेंनी मिरा रोडमधील सभेत इशारा दिला आहे. निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू अशी धमकी दिली होती. त्यावरुन राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत मुंबईत येण्याचं आव्हानच दिलं. माज घेऊन अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच असा आदेशही त्यांनी देऊन टाकला. “मराठी माणसांना आपटून आपटून मारु असं म्हणाला. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेलवाल्यांनी काही दाखवलं का? कसे असतात ते पाहा. तू आम्हाला आपटून आपटून मारणार दुबे. मी दुबेलाच सांगतो, तू मुंबईत ये. मुंबईतील समुद्रात बुडवून बुडवून मारु (दुबे तुम मुंबई मे आ जाओ, मुंबई के समुंदरमे डुबे डुबे कर मारेंगे),” असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे.