बीड तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोंनंतर वातावरण आणखी तापलं आहे. राजकारणासोबतच सोशल मीडियावर या सगळ्याचे पडसाद उमटत आहे. संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांना जो अमानुष त्रास दिला गेला त्याचे पडसाद सोशल मीडियावर देखील उमटताना दिसत आहे. सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे. एवढंच नव्हे तर कलाकारही यावर संताप व्यक्त करत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होत असल्याची प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे.

सचिन गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,’संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं. विकृतीची परिसीमा आहे ही… महाराष्ट्र असा नव्हता… दुःखद…’ अशी भावना सचिन गोस्वामी यांनी व्यक्त केली आहे.

पृथ्विकची पोस्ट
तसेच या संपूर्ण प्रकरणावर पृथ्वीक प्रतापची पोस्ट देखील अंर्तमुख करणारी आहे. संतोष देशमुखांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी पृथ्वीक प्रतापने केली आहे.
“मन सुन्न करणारे,
मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो…
संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा,” अशी पोस्ट पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर केली आहे.
(हे पण वाचा – राजीनामा दिलाच! धनंजय मुंडेंचा पाय नेमका कसा खोलात गेला? आरोपांचा A to Z घटनाक्रम अखेर समोर)
धनंजय मुंडे यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राजीनामा दिला आहे. दोन महिन्यांपासून यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे.
