
Engineering topper became thief: इंजिनियरींगचा टॉपर मुलगा पहिल्यांदाच पुण्यात आला. लवकर श्रीमंत होऊ म्हणून सोन्याच्या दुकावर डाका टाकला. शक्कल लढवली तरीही पोलिसांच्या तावडीतून सुटला नाही. पुण्यातील सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या इंजिनियरींगचा टॉपर मुलला पोलिसांनी शक्कल लढवून थेट कर्नाटकातून जेरबंद केलं. त्याच्याकडून 4 लाखांचे दागिने जप्त केले. मात्र या दरम्यान पोलिसांना चांगलाच घाम फोडला. चोरी केलेल्या इंजिनियरने नेमकं काय केल ? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या एका 21 वर्षीय इंजिनीअरिंग टॉपरच्या कहाणीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा तरुण लिखित जी हा कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील एक हुशार विद्यार्थी आहे. जो सरकारी इंजिनीअरिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकतोय. तो पहिल्या सत्रात 93 टक्के गुण मिळवून तो कॉलेजचा टॉपर ठरला होता. पण या हुशार विद्यार्थ्याने लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी पुण्यात येऊन सोन्याच्या दुकानावर डाका टाकला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या घटनेने त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विरोधाभासाने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
नेमकं काय घडलं?
लिखित जी हा मूळचा कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील आहे. तो आपल्या आजी-आजोबा आणि पणजीसोबत राहतो. घरात काही कारणाने भांडण झाल्याने तो रागाच्या भरात पुण्यात आला. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर फिरत असताना त्याला तिथल्या चमचमणाऱ्या सोन्याच्या दुकानांनी भुरळ घातली. श्रीमंत होण्याच्या स्वप्नांनी पछाडलेल्या लिखितने दुकानाची रेकी केली आणि दोन दिवसांनी परत येऊन चोरीचा कट रचला. बुधवार पेठेतील एका ज्वेलरी दुकानात, जे खास एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे त्याने 6 जुलै 2025 रोजी रात्री चोरी केली. या चोरीत त्याने 4 लाख 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरीचा डाव आणि पोलिसांचा तपास
लिखितने चोरीसाठी खूपच शक्कल लढवली. दुकानाच्या बाथरूममधील खिडकीतून तो आत शिरला आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला. पण निघताना त्याच्या हाताला बाथरूमची काच लागली आणि तो जखमी झाला. परिणामी दुकानात ठिकठिकाणी रक्ताचे डाग पडले. सकाळी दुकानाचा मालक आला तेव्हा त्याला हे रक्त आणि दुकानातील गायब झालेले दागिने दिसले. त्याने तात्काळ विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि परिसरातील २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे पोलिसांना लिखितचा माग लागला. तो कर्नाटकातील कोलार गावात पळून गेला होता. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले पण त्याने पोलिसांना गुंगारा देण्याचा खूप प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी हुशारीने त्याचा पाठलाग करत अखेर त्याला कोलारमधून अटक केली. त्याच्याकडून 4 लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
श्रीमंत होण्याची स्वप्नं आणि चूक
लिखितच्या डोक्यात लवकर श्रीमंत होण्याचं भूत स्वार झालं होतं. त्याला बाईक आणि कार घ्यायची होती, आणि त्यासाठी त्याने चोरीचा मार्ग निवडला. इंजिनीअरिंगमध्ये टॉपर असलेल्या या तरुणाने अशी गुन्हेगारी कृत्य करण्याचा निर्णय का घेतला?, हे अनेकांना आश्चर्यचकित करणारं आहे. त्याच्या या कृत्याने त्याचं उज्ज्वल भविष्य धोक्यात आलं आहे.
सोन्याच्या दुकानांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह
विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणात खूप मेहनत घेतली. सीसीटीव्ही फुटेज, रक्ताचे डाग आणि लोकेशन ट्रेसिंगच्या आधारे त्यांनी लिखितला शोधून काढलं. त्याने पोलिसांना चकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. या घटनेमुळे पुण्यात आणि आजूबाजूच्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. एका हुशार विद्यार्थ्याने असा मार्ग का निवडला, याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.या घटनेने पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सोन्याच्या दुकानांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेयत.