
Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी विरोधात बोलणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मीरा रोडच्या सभेत बोलताना राज ठाकरेंचं आक्रमक रुप पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी हिंदी सक्तीचा विषय आणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. तसेच भाजप खासदार दुबेलाही आव्हान दिले. मुंबईत आलास तर तूला डुबवून डुबवून मारु असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता अल्पेश कथीरियाने राज ठाकरेंवर टीका केलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा रोजच्या सभेत सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांच्याबद्दल विधान केले होते. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव काही गुजरात्यांचा होता. याची सुरुवात वल्लभभाई पटेल यांनी केली. पुढे मोरारजींच्या आदेशाने मराठी माणसांवर गोळीबार झाला. या वक्तव्यावर गुजरातमधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांनी संपूर्ण देशवासीयांसमोर माफी मागावी, अशी मागणी गुजरातमधील भाजप नेते अल्पेश कथीरिया यांनी केली.
अल्पेश कथीरिया यांचे आवाहन
अल्पेश कथीरिया यांनी सांगितले की, राज ठाकरे यांचे हे वक्तव्य महाराष्ट्र आणि गुजरातमधील जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. राज ठाकरेंचा मनसे पक्ष सध्या अस्तित्वाच्या संकटातून जातोय आणि या वक्तव्यामागे त्यांचा पक्ष पुन्हा उभा करण्याचा राजकीय डाव असू शकतो, असे ते म्हणाले. “सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांच्यासारख्या थोर नेत्यांचा आणि गुजराती समाजाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या चुकीची जाणीव ठेवून तात्काळ माफी मागावी, असे कथारिया म्हणाले.
काय आहे नेमकं प्रकरण?
दहिसर ते पालघर इथे अमराठी मतदारसंघ बनवायचेत. हळुहळू मुंबईचा संपूर्ण पट्टा गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होतोय. हा प्रांत हिंद प्रांत आहे. महाराजांची इच्छा हिंदुवी स्वराज्य नाही तर हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती. माज घेऊन अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच असेही राज ठाकरे म्हणाले. तसेच मराठी-हिंदी भाषा वादाच्या संदर्भात एका सभेत बोलताना सरदार वल्लभभाई पटेल आणि मोरारजी देसाई यांच्यावर मराठीविरोधी धोरणांचा आरोप केला होता. स्वातंत्र्यानंतर या नेत्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला गुजरातपासून वेगळे न करण्याच्या सूचनेचा अवमान केला आणि मराठी भाषा आणि संस्कृतीवर अन्याय केला. गुजराती नेते आणि व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्र-गुजरात संबंधांवर परिणाम
या वक्तव्यमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील सौहार्दपूर्ण संबंधांवर ताण येण्याची शक्यता असल्याचे कथीरिया म्हणाले.हा केवळ राजकीय स्टंट आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाला पुन्हा चर्चेत आणायचे आहे, आणि त्यासाठी ते असा भडकाऊपणा करत आहेत. अशा वक्तव्यांमुळे दोन राज्यांमधील जनतेत तेढ निर्माण होऊ शकते. अशा वक्तव्यांना बळी पडू नये आणि एकजुटीने याचा विरोध करावा, असे कथारिया म्हणाले.
पुढे काय?
हा वाद पुढे काय वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि सामाजिक संघटना यावर कशी प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अर्थातच राज ठाकरे माफी मागणार नाहीत. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र होणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.