![]()
फोडाफोडी हा सध्याच्या राज्य सरकारचा स्थायीभाव आहे. त्यामुळेच दहावीचा मराठीचा पेपर देखील फुटला असल्याची टीका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेचा देखील पेपर फुटत असेल तर हे दुर्दैवच आहे,
.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. आज मातृभाषा दिन असून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु झाले आहे. त्याची आजच सुरुवात झाली आहे. असे असताना महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा पेपर फुटत असेल तर हे दुर्दैव असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. लगे रहो महायुती सरकार, असे म्हणत त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. आता महाराष्ट्र थांबणार नाही, या महायुती सरकारच्या घोषवाक्याचा देखील रोहित पवार यांनी खोचक शब्द उल्लेख केला आहे.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘फोडाफोडी हा या सरकारचा स्थायीभाव असल्याने १० वीचा मराठी भाषेचाही पेपर फुटला… विशेष म्हणजे आज मातृभाषा दिन असून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही आजच सुरवात झाली तरी मराठी भाषेचाही पेपर फुटत असेल तर हे दुर्दैवच आहे… लगे रहो महायुती सरकार! महाराष्ट्र आता थांबणार नाही!’
नेमके प्रकरण काय?
आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. मात्र जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे परीक्षा सुरू झाल्याच्या काही वेळातच मराठीचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्या दिवशी कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडला. एकीकडे प्रशासनाच्या वतीने कॉफी मुक्त अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे पहिल्याच मराठीचा पेपर जालना जिल्ह्यामध्ये लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर केवळ वीस रुपयात परीक्षा केंद्र बाहेर पेपरची कॉपी मिळत होती, असा देखील आरोप केला जात आहे. त्यामुळे आता या संदर्भात शिक्षण विभाग काय निर्णय घेतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला – वैशाली जामदार
या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणाचे कोणी दोषी असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही जामदार यांच्या वतीने सांगण्यात आला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचाही पेपर फुटला नसल्याचा दावा
जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी मराठीचा पेपर फुटला नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, आज काही वृत्त वाहिन्यांनी ‘जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरात दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला’ या आशयाचे चुकीचे वृत्त प्रसारित केले आहे. पण प्रत्यक्षात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. स्थानिक झेरॉक्स सेंटर चालकांनी आजच्या मराठी विषयाच्या प्रश्न पत्रिकेत न आलेल्या प्रश्नांची झेरॉक्स काढून विक्री केली आहे. प्रश्न पत्रिका परिक्षा केंद्राच्या बाहेर आली नाही. तथापि याठिकाणी दगडफेक झाली. याबाबत दोषी व्यक्तीचा शोध घेवून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
