
Cyber Crime: हल्ली सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरटीओ चलानच्या नावे एपीके फाइल पाठवून मोबाईल हॅक करण्याचा प्रकार समोर आला आहे. छावणीतील एका मेडिकल व्यावसायिकाने आरटीओ चलान नावाची एपीके फाइल इन्स्टॉल करताच क्षणात त्याचा मोबाईल हॅक झाला आणि काहीच मिनिटांत मोबाईलमधून 9 लाख रुपये लंपास झाले. मंगळवारी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यावसायिक वसीमोद्दीन यांना १५ जुलै रोजी ‘रिजास हेल्थ केअर’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘आरटीओ चालान ५०० रुपये’ या नावाने मेसेज आला. हा एपीके फॉरमॅटमधील मेसेज होता. वसीमोद्दीन यांनी त्यावर क्लिक करताच फोन हॅक झाला. त्यानंतर त्यांच्या फोनवर अनेक ओटीपी येण्यास सुरुवात झाली. त्यांना काहीतर चुकीचं झाल्याची जाणीव होताच त्यांनी नेट बँकिंगच्या माध्यमातून बँक खाते गोठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या सर्व बँकेचे पासवर्ड बदलून 2 लाख काढले. त्यानंतर काहीच मिनिटांत थेट सात लाख रुपये काढले. इतकंच नव्हे तर सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या 3 लाख 45 हजारांचे जंबो लोन घेतले.
APK म्हणजे काय?
अँड्रॉइड पॅकेज किट म्हणजे एपीके (Apk). हे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे अॅप्लिकेशन्स इंस्टॉल करण्यासाठीची फाइल असते. प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर खात्रीशीर अॅप्स असतात. मात्र, येट लिंक, टेलिग्राम, व्हॉटसअॅप ग्रुपवर आलेल्या अशा APK फॉरमॅटमधील फाइल्स धोकादायक असतात.
काय आहे हा स्कॅम?
आधी शासकीय योजनांच्या नावाने एपीके फाइल्स फॉरवर्ड होत होत्या. सध्या ‘आरटीओ चालान’ नावाने होत आहे. ती इंस्टॉल करताच गुन्हेगार तुमच्या मोबाइलचा ताबा मिळवतात. एपीके अॅपवर क्लिक करताच हिडन अॅप इंस्टॉल होऊन (मोबाइलमध्ये दिसत नाही) बॅकग्राउंडला सुरू करते. तुम्ही मोबाइलमध्ये जे काही करता, ते सायबर गुन्हेगारांना दिसते. बँक अॅप उघडताच ते त्याचाही ताबा मिळवतात. तुमचे सर्व मेसेज, कॉल एका विशिष्ट नंबरला ऑटो फॉरवर्ड होतात.
काय काळजी घ्यावी?
– व्हॉट्सअॅपचे ऑटो डाउनलोड मोड कायम बंद ठेवा.
– अनोळखी अॅप इंस्टॉल झाल्यास पहिले फ्लाइट मोड ऑन करा. त्यानंतर डिव्हाइस फॅक्टरी रिसेट करा.
– तत्काळ 1930 क्रमांकावर तक्रार नोंदवा.